किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या गाळप हंगामातील पहिल्या ५ साखर पोत्यांचे पूजन सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी रामराव निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यंदाच्या हंगामात कारखान्याने १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
रविवारी ११ ऑक्टोबर रोजी कारखान्याचा चालू गाळप हंगाम सुरू झाला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २३ हजार ७७६ एकर, तर कार्यक्षेत्राबाहेर ११ हजार ४०० एकर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे.१२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेचे काटेकोर नियोजन पूर्ण झाले आहे. कमी वेळेत यंत्रसामग्री व ओव्हरहॉलिंगची कामे पूर्ण केल्यामुळे कारखाना निर्धारित वेळेत सुरू करणे शक्य झाले असून कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे आणण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.
माझा कारखाना, माझी जबाबदारी भावनेतून ऊस द्या : अध्यक्ष व उपाध्यक्षांचे आवाहन
कारखान्याचे ऊस गाळप वाढल्यास साखर, मोलॅसेस आणि वीजनिर्मितीमध्ये वाढ होऊन कारखान्याची आर्थिक घडी अधिक मजबूत होण्यास मदत होईल. हा कारखाना टिकला तरच सभासद आणि कामगारांचे हित जपले जाईल. त्यामुळे माझा कारखाना, माझी जबाबदारी या भावनेतून सभासदांनी आपला संपूर्ण ऊस छत्रपती कारखान्यालाच देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर यांनी केले.
या पूजनप्रसंगी कारखान्याचे संचालक कैलास गावडे, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अनिल काटे, संतोष मासाळ, अशोक पाटील, सुचिता सपकळ, हणमंत घोळवे, सत्यवान चव्हाण, कार्यकारी संचालक अशोक जाधव, चीफ इंजिनिअर निखील रणवरे, चीफ केमिस्ट अमर जगताप, कामगार नेते युवराज रणवरे यांच्यासह भूषण टकले, विठ्ठलराव फडतरे, दादासाहेब घुले आणि कारखान्याचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.











