बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीचा दूध संघाचा संचालक सतीश पिसाळ याच्यावर अगोदरच चुलतभावाच्या म्हणजे धनराज पिसाळ याच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्यानंतर चुलत बहीण धनश्री पिसाळ यांचीही 32 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, आता बारामती दूध संघाकडे दिलेल्या दोन टेम्पोचा उत्पन्नाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात सतीश पिसाळ याच्यासह विनायक दगडू पिसाळ विश्वनाथ उर्फ ईश्वर सखाराम दगडे व ज्ञानराज विश्वनाथ उर्फ ईश्वर दगडे या चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आशा जयवंत पिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सतीश हरीश्चंद्र पिसाळ याच्यावर आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याची माहिती अशी की, जयवंत पिसाळ यांनी मुलगा धनराज याच्या नावे महाराष्ट्र बॅंकेतून कर्ज घेतले होते आणि त्यातून दूध संकलन व वाहतुकीसाठी दोन टेम्पो खरेदी केले होते, ही दोन्ही वाहने जयवंत पिसाळ यांनी बारामतीच्या अजितदादा दूध वाहतूक संस्थेकडे दूध वाहतूक व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर दिली होती.
त्या दोन्ही वाहनांचा व्यवसायिक मोबदला हा धनराज पिसाळ यांच्या बँक खात्यावर वाहतूक संस्थेकडून जमा होत होता. दोन्ही वाहनांच्या दैनंदिन देखभाल दुरुस्ती, चालक, व्यवस्थापन इत्यादी कामे जयवंत पिसाळ यांनी त्यांच्या हयातीत विश्वासाने पुतण्या सतीश पिसाळ यांच्याकडे सोपवली होती. मात्र जेव्हा 4 एप्रिल 2022 रोजी आशा पिसाळ व धनराज पिसाळ हे दोघेजण या दोन्ही वाहनांच्या व्यवसाय उत्पन्नाचा मोबदला घेण्यासाठी व वाहने ताब्यात घेण्यासाठी गेले असता सतीश पिसाळ याने दमबाजी केली व वाहने आणि मोबदला देण्यास नकार दिला.
ही वाहने 31 मे 2026 पर्यंत सतीश पिसाळ याने धनश्री पेट्रोलियम येथे स्वतःच्या ताब्यात ठेवली होती. दरम्यान जयवंत पिसाळ यांच्या निधनानंतर सतीश पिसाळ याने परस्पर अजितदादा दूध उत्पादन व वाहतूक संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे मुलाचे नाव बेदखल करून दोन्ही वाहनांपासून मिळणारे उत्पन्न सतीश पिसाळ व विनायक पिसाळ या दोघांनी स्वतःकडे घेतले व त्यानंतर ही वाहने सतीश पिसाळ व विनायक पिसाळ या दोघांनी विश्वनाथ दगडे, ज्ञानराज दगडे यांच्या ताब्यात दिली असल्याचे आढळून आल्याने आशा पिसाळ यांनी वरील चौघाजणाविरोधात गुन्हा दाखल केला.











