केडगाव येथील मयुरेश्वर आर्थिक लुट प्रकरण
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील केडगाव येथील मयुरेश्वर हॉस्पिटल कडून कोरोना बाधित रुग्णांची लाखो रुपयाची लूट केल्याचे तहसीलदार यांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या आर्थिक लुट झालेल्या रूग्णांची बिल रूग्णालयाकडून तातडीने वसूल करावेत असा आदेश दौंड – पुरंदरचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिले आहेत.
केडगाव येथील मयुरेश्वर रूग्णालय प्रशासनाने खाजगी कोविड सेंटर ताब्यात घेतले होते. मात्र या कोविड सेंटरमध्ये कोरोना उपचाराच्या नावाखाली लाखो रूपयांची आर्थिक लूट केल्याचा आरोप रूग्णांनी जिल्हाधिकारी, आरोग्य मंत्री व राष्ट्रवादी कॅाग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्याकडे केली होती.
वैशाली नागवडे यांनी काही दिवसापुर्वी संबंधित रूग्णालयात जाऊन याचा जाब विचारला होता. शासकीय अधिकारी यांच्यासह रूग्णालय व्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरले होते. याप्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार तहसीलदार यांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची समिती नेमली होती.
या समितीने मयुरेश्वर रूग्णालयात रूग्णांकडून आर्थिक लूट होत असल्याचा अहवाल तहसीलदार यांना दिला. तहसीलदार यांच्या आदेशानुसार डॉ. बी.बी. खळदकर यांनी हॉस्पिटलकडून 40 पॉझिटिव्ह व 37 निगेटिव्ह रुग्णांच्या फाईल तपासल्या होत्या. त्यात लाखो रुपयांची लुट करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले.
तहसीलदार यांनी हा अहवाल पुढील कार्यवाही जिल्हाधिकारी व दौंड-पुरदंरचे प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविला. तहसीलदार यांच्या अहवालाची त्वरीत दखल घेत प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी रूग्णालयाने संबंधित रूग्णांची लूटलेली रक्कम वसुल करून रुग्णांना परत करण्याचे आदेश तहसीलदार यांना नुकतेच दिले आहेत.
दरम्यान याप्रकरणात तहसीलदार यांनी योग्य ती दखल घेत कारवाईला सुरवात केल्याने व रूग्णांना लुट केलेली रक्कम देण्यासाठी कारवाईस सुरवात केल्याने नातेवाईक व रूग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.
तहसीलदार यांनी तालुक्यातील इतरही खाजगी कोविड सेंटरमध्ये अशाच प्रकारची आर्थिक लूट करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असून या रूग्णालयांची देखील चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान प्रशासनाकडून संबंधित रुग्णालयावर कारवाईची बडगा सुरू झाल्यानंतर रूग्णालय व्यवस्थापकांनी आपली राजकीय ताकद वापरण्यास सुरवात केली आहे. संघटनेचा आश्रय घेवून प्रशासनावर दबाव तंत्र वापरण्याचे काम सुरू असून त्यासाठी काही बड्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
दौंड तालुक्यातील काही रूग्णालयाच्या मनमानी कारभारामुळे अनेक रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला नाही. या योजनेत ही आर्थिक लूट व भ्रष्टाचार झाला आहे. याची देखील सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय होणे अपेक्षित आहे – वैशाली नागवडे – (जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी)











