बारामती : महान्यूज लाईव्ह
आज बारामती शहरातील वसंतनगर भागातील आणखी एका महिलेस कोरोनाची लागण झाली असून तरडोली येथील मृत संशयित कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
काल दिवसभरामध्ये ११५ संशयितांच्या तपासणीमध्ये चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, त्यानंतर आज सकाळी पुन्हा बारामतीतील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेस कोरोनाची लागण झाली. तत्पूर्वी आज सकाळी रुई येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या चोपन्न वर्षीय रुग्णाचा त्रास अधिक वाढल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे तरडोलीसह आसपासच्या गावांमध्ये ही चिंता निर्माण झाली होती, परंतु त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. यामुळे या गावांना व प्रशासनातही दिलासा मिळाला आहे.
हा रुग्ण लोणी काळभोर येथील असून तो तरडोली येथील त्यांच्या आई-वडिलांकडे आला होता मात्र त्यास त्रास सुरू झाल्याने खाजगी दवाखान्यात दाखल केल्यानंतर कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्याने तेथील डॉक्टरांनी त्यास रुई येथील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी त्याची लक्षणे पाहून घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी देण्यात आला, परंतु त्याचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. दरम्यान अजूनही अनेक अहवाल प्रतीक्षेत असून काल आढळून आलेल्या चार कोरोना रुग्णांच्या संपर्कातील संशयितांचे अहवाल बाकी आहेत.










