पुणे जिल्हा टीबी, मलेरिया आणि डेंग्यू मुक्त करण्याचे उद्दीष्ठ – खा. सुळे
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरला भेट देऊन आरोग्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर सहभागी होते.
इंदापूरात गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठया संख्येने आढळून आले, आता नव्याने आढळलेल्या रुग्णांचा कोरोनाचा संक्रमणाचा इतिहास नसल्याने आरोग्य प्रशासनापुढेही प्रश्न आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत, या पार्श्वभूमीवर सुळे यांनी आज इंदापूरात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. कोरोनामुक्त इंदापूरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊन मोठ्या संख्येने रुग्ण आढळणे चिंतेची बाब असल्याने नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावेत असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर त्यांनी समाधान व्यक्त केले. बाजारपेठा बंद ठेवणे हा पर्याय होऊ शकत नाही, दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्यास हरकत नाही, मात्र स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन व कोरोनाच्या फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरोग्य, शिक्षण, रोजगार व उद्योग व्यवसायाच्या विषयावर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
इंदापूर तालुक्यात शिक्षण आणि रोजगारावर अधिक महत्व द्यावे लागेल असे मत सुळे यांनी व्यक्त करीत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या यू ट्यूब चॅनेलच्या उपक्रमाचे कौतुक केले. २५ टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून अद्याप वंचित असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल राऊत, नगरसेवक पोपट शिंदे, अनिकेत वाघ, पोलिस निरिक्षक नारायण सारंगकर, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, वैद्यकीय अधिकारी एकनाथ चंदनशिवे, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा क्षयरोग, डेंग्यू व मलेरियामुक्त करणार
यावेळी पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी कोरोना पेक्षा जास्त मृत्यू होणाऱ्या आजारांविरोधात लढणार असल्याचे सांगितले. येत्या चार वर्षात खासदार अमोल कोल्हे व माझा पुणे जिल्हा हा क्षयरोग, डेंगी व मलेरियामुक्त करण्यावर भर राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. दरवर्षी साडेचार लाख लोकांचा क्षयरोगाने मृत्यू होतो. कोरोनापेक्षा हा आजार भयंकर आहे. त्यासाठी दोन्ही मतदारसंघात याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.










