उत्तर प्रदेशात शिक्षणमंत्र्यांवरून सुरू आहे ट्विटरवॉर
टिम महान्यूज लाईव्ह
उत्तर प्रदेशात आज बराच हंगामा झाला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात भाजपप्रणित महाराष्ट्र बचाओ आणि महाविकासआघाडी प्रणित महाराष्ट्रद्रोही बीजेपी असा एक ट्विटरवर ट्रेंड झाला आणि यात महाविकासआघाडीच्या नेटकऱ्यांनी बाजी मारली होती. आज सतीश द्विवेदी या नावावरून असेच वादळ उत्तर प्रदेशात उठले आणि तेवढ्यापुरते राहीले नाही. सतीश द्विवेदी इस्तिफा दो आणि सपोर्ट सतीश द्विवेदी या दोन परस्परविरोधी तराजूंमध्ये आजचा ट्रेंडवॉर राहीला. इस्तिफा दो हा ट्रेंड आज संध्याकाळी २ लाख २७ हजारांवर तर सपोर्ट सतीश द्विवेदी ट्रेंड २ लाखांवर होता. उत्तर प्रदेशातही भाजपा विरूध्द आरक्षण समर्थक असा एक तिढा तरुणाईत निर्माण झाला आहे. सतीश द्विवेदी हे शिक्षणमंत्री आहेत आणि ६९ हजार शिक्षकांच्या भरतीवरून त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
उत्तर प्रदेशात ६९ हजार शिक्षकांच्या भरतीमध्ये कथित घोटाळ्यावरून मोठे रणकंदन सुरू आहे. याची सुरवात राहूल नावाच्या परीक्षार्थीकडून झाली. राहूलने जिल्हा पोलिस अधिक्षक सत्यार्थ पंकज यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरून राज्यातील प्रयागराज जिल्ह्यातील सोरांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा शिक्षकांच्या भरती प्रकरणात साडेसात लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणातील होता. अर्थात विषय लाचखोरीतीलच नाही. तर आरक्षणाशी संबंधित देखील आहे. तेथील ४० व ४५ ट्कक्यांतील आरक्षणातूनही नाराजी उघडपणे सुरू आहे.
शिवाय ज्या लाचखोरीवर बोलले जात आहे, त्या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापर्यंत असल्याची चर्चा आहे. कारण राज्यातील ६९ हजार शिक्षकांच्या भरती प्रकरणात घोटाळा उघडकीस आल्यानंतर पकडण्यात आलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्यासह त्याचा साथीदार हा व्यापम घोटाळ्यातही होता अशी माहिती पुढे आली. एकंदरीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हे प्रकरण प्रतिष्ठेचे केले असून ६९ हजार शिक्षकांची भरती होत असताना उगीचच काही जण त्यात मिठाचे खडे टाकत असल्याची टिका करीत आपण याला अधिक महत्व देत नसल्याचे अधोरेखित केले आहे.
या प्रकरणावरून सध्या उत्तर प्रदेशात वातावरण तंग झाले आहे. कोरोनाच्या काळातही तरुणाई राज्य सरकारच्या शिक्षण विभागाविरोधात जोराने या लढ्यात उतरली असून महाराष्ट्रासारखाच एक ट्रेंड आता उत्तर प्रदेशात आज सुरू आहे.










