महान्यूज : आजची गझल
शहारे घर जराशी थाप पडल्यावर
कुणी नसतेच दरवाजा उघडल्यावर
●
अचानक थांबला हबकून वाजंत्री
मिठीमध्ये मुलीच्या बाप रडल्यावर
●
कुणाचा उंबरा घेतोय कानोसा
घराचा एक कोना सुस्त पडल्यावर
●
अटळ होता मला भेटेल तो रस्ता
तुझ्या तू वेगळ्या वाटा निवडल्यावर
●
शहर नाही कुणाला वाचवू शकले
कुणी चौकातल्या पुतळ्यास नडल्यावर
●
सुनेने फोन केला मागण्या हिस्सा
मुलाच्या फ्लॅटचा हफ्ता रखडल्यावर
●
असा अर्ध्यामधे सोडू नको जन्मा
तुझी बोटे भरोश्याने पकडल्यावर
●
गझलकार- गणेश नागवडे, राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी-चिंचवड