बारामती : महान्यूज लाईव्ह
सलग दौरे व नुकसान पाहणीच्या निमित्ताने राज्यभरात फिरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थकवा वाटत असल्याने, त्यांनी कालपासून त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. दरम्यान त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली असून ते सध्या क्वारंटाईन आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. अजित दादांनी चार दिवसापूर्वीच इंदापूर, बारामती व सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. येथील नुकसानीची पाहणी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून अजितदादा सातत्याने कामात व्यस्त आहेत. कोरोनाच्या काळात देखील पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री, मध्यरात्रीपर्यंत अजित पवार हे मंत्रालय व इतर राज्यभरातील लोकहिताच्या कामांमध्ये सक्रिय आहेत, याची दगदग वाढत गेल्याने अजित पवार यांना कालपासून थकवा जाणवत असल्याने त्यांनी स्वतःहून क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला.
यादरम्यान त्यांची कोरोनाचीची चाचणी करण्यात आली, मात्र ती निगेटिव्ह आली असून, राज्यातील काही प्रसारमाध्यमांनी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त दिले आहे, परंतु पवार यांच्या निकटवर्तीयांनी यामध्ये तथ्य नसल्याचे सांगत कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्याचे स्पष्ट केले.











