दौंड : महान्युज लाईव्ह
कोविड -१९ च्या कालावधीत बंद करण्यात आलेले दौंड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) वाहन परवाना शिबीर (कॅम्प) नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात यावे, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार कुल यांनी नुकतीच मुंबईत मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
दौंड शहर आणि तालुक्यातील तरुण, वाहनचालक आणि नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) व आरटीओ संबंधित इतर कामांसाठी सध्या बारामती येथे जावे लागत आहे. कोविडच्या पूर्वी दौंड येथे नियमितपणे वाहन परवाना शिबिरांचे आयोजन केले जात होते, ज्यामुळे स्थानिक पातळीवरच नागरिकांची कामे होत असत. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ही शिबिरे तात्पुरती बंद करण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना, विशेषतः ग्रामीण भागातील तरुण वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आरटीओ कामांसाठी त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असुन नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
आमदार कुल यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली याप्रसंगी दौंड आणि परिसरातील नागरिकांना आरटीओ सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी हे वाहन परवाना शिबीर लवकरात लवकर नियमितपणे सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अशी माहिती आमदार कुल यांनी दिली.











