बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील कन्या तथा आष्टी (जि. बीड) येथील अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्राध्यापक प्रा. शुभांगी मनोहर खुडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. खुडे यांनी “आत्मकथा लेखन की चुनौतियाँ और स्त्री प्रश्न (दलित स्त्री आत्मकथाकारों के विशेष संदर्भ में)” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांच्या या संशोधन कार्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागातील डॉ. नितीन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे, प्रा. शुभांगी खुडे यांचे पती तथा सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्राध्यापक प्रा. पोपट जाधव यांनाही मागील आठवड्यात हिंदी विषयात पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.
एकाच आठवड्यात, एकाच विषयात आणि एकाच संशोधन केंद्रातून पती-पत्नीने पीएचडी पदवी संपादन केल्याने शैक्षणिक क्षेत्रात या यशाची विशेष चर्चा होत असून मित्रपरिवार, नातेवाईक, सहकारी तसेच समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे, प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे, सचिव अतुलशेठ मेहेर, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. शुभांगी खुडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










