संदिप मापारी पाटील, बुलढाणा
जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार येथे दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य योग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक उत्साहात पार पडली.

या बैठकीस इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन (INO) चे अध्यक्ष तसेच आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉ. अनंत बिरादार हे विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी होते. यावेळी नंदकुमार मापारी, भगवान पाटील सुलताने आणि पांडुरंग सरकटे हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात योगशिक्षकांनी सादर केलेल्या योगगीत व प्रात्यक्षिकांनी झाली. यानंतर डॉ. अनंत बिरादार यांनी मार्गदर्शन करताना योग महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करून त्यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याची माहिती दिली. योग हा केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित नसून, निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने तो अंगीकारणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच, योग महोत्सवात सहभागी होण्यासाठी विशेष नोंदणी लिंक तयार करण्यात आली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम मापारी यांनी उपस्थित योगशिक्षकांचे आभार मानले. योगशिक्षकांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आपण तत्पर आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे लोणारसारख्या ठिकाणी एवढा मोठा योग महोत्सव आयोजित होत असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगाचे ज्ञान आत्मसात करावे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीस INO विदर्भ अध्यक्ष डॉ. नारायण अंभोरे, मराठवाडा अध्यक्ष डॉ. शेख शकील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. संजना सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. तसेच डॉ. गजानन बाजड, डॉ. प्रेमदास वाकोडे, डॉ. गजानन चेके, डॉ. विठ्ठल देशमुख, डॉ. अनिकेत शिंदे, डॉ. तृप्ती काटेकर आणि डॉ. मंजू जाधव यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.











