किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
सणसर : सणसर – ( ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक मेघडंबरी बनवून मंदिराचे रंगकाम पूर्ण झाले असून मंदिराचा कायापालट झाला आहे. भैरवनाथ यात्रा कमिटी व सणसर ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून आकर्षक कलाकुसर असलेल्या मेघडंबरीचे काम पूर्ण झाले आहे.
भैरवनाथाचे मंदिर सन १८४४ मध्ये बांधण्यात आले असून पूर्वी मंदिर दगड ,माती आणि चुण्याचा वापर करून बांधले होते. जुन्या मंदिराच्या डागडुजीचा विषय सर्वप्रथम गावातील संजय पांडुरंग निंबाळकर या युवकाने मनावर घेतला आणि गावातील युवकांना एकत्र करून मंदिराच्या डागडुजीस सुरुवात झाली.
जुन्या मंदिरातील मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला टाईल्स फरशी व मंदिराला रंग देण्यात आला. यानंतर थोड्याच दिवसात ग्रामस्थांनी या लहान आकारातील मंदिराला भव्य स्वरूप देण्याचे ठरवले आणि थोड्याच दिवसात या जुन्या मंदिराच्या जागी भव्य असे सभामंडप असलेले व उंच शिखराचे श्री भैरवनाथचे मंदिर दिमाखात उभा राहिले.
येथे दर अमावस्येला मंदिरात भैरवनाथाची आरती करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र येतात. त्याचबरोबर भैरवनाथांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यावेळी संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मंदिराच्या प्रशस्त असणाऱ्या सभामंडपात अनेक धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे पार पडतात.
भैरवनाथाची यात्रा अक्षय तृतीयेला दोन दिवसांची भरते. देवाचे लग्न, छबिना पालखीतून संपूर्ण गावात मिरवणूक काढली जाते. यात्रा कमिटीच्या पुढाकाराने करमणुकीचे कार्यक्रम, कुस्त्या, बैलगाडी शर्यत, दारूगोळा, किर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रा कालावधीत गावातील नोकरी निमित्त बाहेरगावी असलेली सर्व कुटुंबे गावात येऊन भैरवनाथाच्या चरणी लीन होतात.











