बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरातून केलेल्या संशोधनाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाने (University of Nebraska) यूएसडीए (USDA) अंतर्गत ट्रस्टसोबत तीन वर्षांचा सामंजस्य करार (MoU) केला आहे. सोयाबीन आणि मका पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संशोधन आणि त्याचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.
ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांपासून बारामतीत AI आधारित कृषी संशोधन सुरू आहे. विशेषतः ऊस शेतीत या तंत्रज्ञानामुळे अनेक यशोगाथा घडल्या असून, त्याकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या कार्याची दखल घेत जागतिक स्तरावरील उद्योजक एलोन मस्क आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनीही आपल्या माध्यमांतून उल्लेख केल्यामुळे बारामतीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
करारानंतर तातडीने अंमलबजावणी करत बारामती परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आणखी तीन टप्पे पुढील काही महिन्यांत घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रारंभीच्या आभासी कार्यशाळेत USDA-ARS अडॅप्टिव्ह क्रॉपिंग सिस्टिम्स लॅबोरेटरीच्या अमेरिकन शास्त्रज्ञांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील (KVK) शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले.
यामध्ये रोपांची वाढ, माती प्रक्रिया, हवामानाचा प्रभाव, सिंचन व खत व्यवस्थापन यांसारख्या बाबी समजून घेण्यासाठी CLASSIM सारख्या साधनांचा वापर करून ‘क्रॉप सिम्युलेशन मॉडेलिंग’वर भर देण्यात आला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाची रूपरेषा, पीक वाढीचे मॉडेल आणि पीक वर्तन विश्लेषण यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.
दुसऱ्या सत्रात नेब्रास्का वॉटर सेंटरचे डॉ. क्रिस प्रोक्टोर, डॉ. जुडे कोबिंग आणि डॉ. चित्तरंजन राय यांनी मका व सोयाबीन शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत, स्थानिक हवामान व परिस्थितीनुसार बदल करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन कसे मिळवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनीही AI च्या वापराबाबत आपले सकारात्मक अनुभव व्यक्त केले. भारतातील कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे संशोधन आणि बारामती यांची सांगड घातल्यामुळे जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे मत नेब्रास्का विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. क्रिस प्रोक्टोर यांनी व्यक्त केले.
यावेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, डॉ. सचिनकुमार नांदगुडे (म.फु.कृ.वि., राहुरी), प्रा. श्रीकांत कर्णेवार, डॉ. धीरज शिंदे यांच्यासह देश-विदेशातील अनेक तज्ज्ञ उपस्थित होते. दरम्यान कृषी प्रमुख राजेंद्र पवार यांनी यावेळी सोयाबीन आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यासाठी नेब्रास्का विद्यापीठाचा हा करार मोलाचा ठरेल. यामुळे भारतातील कृषी संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.











