१३ वर्षांनंतर उजळल्या महाविद्यालयीन आठवणी
बारामती : महान्यूज लाईव्ह
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील बी.कॉम २०१२-१३ उत्तीर्ण बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल १३ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. आर्याबाग, काटेवाडी (ता. बारामती) येथे रविवारी १ मार्च २०२६ रोजी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपापला अल्पपरिचय देत मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातून बी. कॉम उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी, सीए, पत्रकार, पोलीस अधिकारी, वकील, व्यावसायिक, उद्योजक, शिक्षक, खेळाडू तसेच प्रगतशील बागायतदार अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटविल्याचे यावेळी दिसून आले. सुमारे १२५ ते १३० विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्नेहमेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
१३ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर सर्वजण एकत्र आल्यामुळे वातावरणात आनंद, उत्साह आणि जुन्या आठवणींचा भावनिक रंग भरला होता. महाविद्यालयीन जीवनातील सांस्कृतिक कार्यक्रम, अभ्यासातील अनुभव, त्या काळातील किस्से यांची मनमोकळी देवाणघेवाण झाली. अनेक वर्षांनी एकत्र येत सगळ्यांनी मनमुराद हास्य-विनोदाचा आनंद लुटला.
कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजनात्मक उपक्रम, खेळ तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरी, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रवासाविषयी माहिती देत एकमेकांना प्रेरणा दिली. तसेच भविष्यात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन माजी विद्यार्थ्यांच्या समितीमार्फत करण्यात आले. स्वाती ताम्हाणे व नितेश शर्मा यांनी पुढाकार घेत सर्वांना एकत्र आणत आयोजनाची जबाबदारी सांभाळली. सर्वांच्या सहकार्यामुळे स्नेहमेळावा यशस्वीपणे पार पडला. शेवटी एकमेकांसोबतच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करत लवकरच पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











