पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात मंगळवारी दुपारी एक खळबळजनक घटना घडली. एका नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आले. मात्र जेजुरी पोलीस स्टेशन, निरा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या युवकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी कापूरहोळ येथून XUV कारमधून संबंधित युवकाचे अपहरण करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मुलाच्या वडिलांनी मदतीसाठी संपर्क साधला.
माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशन आणि निरा पोलिसांनी जेऊर व निरा परिसरात तात्काळ नाकाबंदी केली.
संशयित वाहनाचा शोध सुरू असताना जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता, रस्ता अरुंद असल्याने ती कार उसाच्या शेतात जाऊन अडकली. दरम्यान, अपहरणकर्ते घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांनी व्यापाऱ्याच्या मुलाची सुखरूप सुटका केली.
ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आणि तात्काळ नाकाबंदी केल्यामुळे मुलाची सुरक्षित सुटका शक्य झाली. आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती दीपक वाकचौरे यांनी दिली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस करत असून, अपहरणामागील नेमके कारण काय, आरोपी कोण आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास केला जात आहे.











