बुरुजाची तात्काळ दुरुस्ती करावी : शिवप्रेमींची मागणी
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूरच्या ऐतिहासिक गढीच्या पूर्वेकडील प्रवेशव्दाराचा बुरुज पावसामुळे रविवारी रात्री ढासळला गेला. इंदापूर नगर परिषदेने तातडीने पडझड झालेले बुरुज दुरुस्त करावेत, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
मालोजीराजेंच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व्हावे यासाठी अनेक वेळा इंदापुरात आंदोलने झाली आहेत.शासन स्तरावर विकास कृती आराखडा तयार करून लवकरच या गढीच्या पुनर्वसन आणि पुनर्जीवन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा झालेला आहे. आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात वारंवार मुद्दे उपस्थित केले आहेत. तर झालेल्या अधिवेशनात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील लक्षवेधी मध्ये हा प्रश्न तारांकित करत सभागृहाचे लक्ष याकडे वेधले होते.
यानंतर राज्याचे सांस्कृतिक पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भात आपल्या दालनात बैठक देखील घेतली होती. लवकरच या संदर्भात कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या.
या गढीचे वैशिष्ट्य फक्त ऐतिहासिकच नाही तर अगदी ब्रिटिश राजवटीतही याच गढीवरून इंदापूरचा कारभार चालत होता. त्यानंतर देश स्वतंत्र झाल्यावर याच गढीवरून इंदापूरचे तहसील कार्यालय चालू झाले. आणि तेथून तालुक्याचा कारभार सुरू झाला. मागील अनेक वर्ष या ठिकाणी हा कारभार चालत होता, त्यानंतर इंदापूर शहरात नव्याने बांधलेल्या प्रशासकीय भवनमध्ये इंदापूर प्रशासनाचा कारभार सुरू झाला.
याच गढीवर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या हजरत चाॅंदशाहवली बाबा यांचा दर्गाह आहे. प्रतिवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी बाबांचा उरूस भरत असतो. आता पुढील एक-दीड महिन्यात हा उरूस पुन्हा या ठिकाणी भरणार आहे.
मालोजीराजेंच्या गढीची अत्यंत दुरावस्था झाली असून इंदापूर नगर परिषदेने तातडीने पडझड झालेले बुरुज दुरुस्त करून घ्यावेत. गढीच्या पुनर्जीवीकरणासाठी अनेक प्रयत्न झाले आता कृतीची गरज आहे. भविष्यात असाच पाऊस झाला, तर ही ऐतिहासिक गढी उध्वस्त होण्याची शक्यता आहे.











