बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनिल पांडुरंग खलाटे यांची, तर उपसभापतीपदी बाळासाहेब बाबुराव पोमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवल्यानुसार या निवडी करण्यात आल्या.बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शौकत कोतवाल आणि उपसभापती शशिकला वाबळे यांनी आपला कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे राजीनामा दिला होता. आज रिक्त झालेल्या या दोन्ही पदांच्या निवडीसाठी बाजार समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत सभापतीपदी अनिल खलाटे यांची, तर उपसभापतीपदी बाळासाहेब पोमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक एस. एस. कुंभार यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप. पंचायत समितीचे माजी सभापती संजय भोसले यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त सभापती व उपसभापतींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे कामकाज करून शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अनिल खलाटे व बाळासाहेब पोमणे यांनी सांगितले.










