शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत चोरी करणाऱ्या आरोपींना शिरूर पोलिसांनी अटक करत बंधाऱ्याचे ढापे,दुचाकी यांसह तीन विद्युत पंप असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचे सत्र सुरू होते.याबाबत पोलिस मागोवा घेत होते. दरम्यान वडनेर येथे रात्रीच्या वेळी बंधाऱ्याचे ढापे चोरून नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यावेळी ग्रामस्थ व पोलिसांनी धाडसाने पाठलाग करत आयशर टेम्पो ताब्यात घेतला. या टेम्पोमध्ये ४९ ढापे असल्याचे आढळून आले. त्यानंतर जांबूत रोड ने पिक अप गाडीचा पाठलाग करत पिकअप गाडी ताब्यात घेत १३ लोखंडाचे ढापे गाडीत आढळून आले. या चोरीच्या घटनेत पळून गेलेल्या तीन आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला.
यामध्ये आयशर टेम्पोचालक गोरक्षनाथ गोंडे (रा.सिन्नर, जि. नाशिक), संजय यादव,प्रकाश गावडे (आंबेगाव, जि. पुणे), अजयकुमार मौर्य (रा. सिन्नर, जि. नाशिक), विरेंद्रकुमार सोनी यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी चोरी गेलेले ढापे, आयशर टेम्पो, पीकअप वाहन असा मुद्देमाल जप्त केला.
तर शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये ५ हिरो स्प्लेंडर, १ होंडा शाईन, १सी डी डीलक्स अशा चोरी गेलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एक आरोपीसह पाच अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले होते. तसेच चोरी गेलेले तीन विद्युत पंप देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.