पुणे : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील वडगाव शेरी परिसरात ही दुर्देवी घटना घडली असून कामावरून काढून टाकले म्हणून त्याचा राग मनात धरून कामगाराने चक्क मालकीणीलाच पेटवून दिले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला असून, मिलिंद नाथसागर असे या 35 वर्षीय कामगाराचे नाव असून बाला जॉनी या 32 वर्षीय मालकिणीचा यामध्ये मृत्यू झाला.
या घटनेत दोघांना वाचवायला गेलेला व्यक्ती देखील गंभीर जखमी झाला असून त्या विचित्र घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडगाव शेरी येथे रामचंद्र सभागृह नजीक शिवणकाम करण्याचे ए टू झेड नावाचे दुकान आहे. या दुकानात मिलिंद नाथसागर हा काम करत होता. मात्र मागील आठवड्यात मिलिंदला या दुकानाची मालकीण बाला हिने कामावरून काढून टाकले.
याचा राग मनात धरून मालकिणीला संपवण्याच्या इराद्याने मिलिंद नाथसागर हा सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास बाला जॉनी हिच्या घरी गेला. त्याने बाटलीत पेट्रोल आणले होते. बाटलीचे टोपण उघडून त्याने काही कळण्याच्या आतच मालकिणीच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि लगेच काडी लावली. मालकिणीच्या अंगावरील कपडे पेट घेताच तिनेदेखील मिलिंदला तू देखील यातून वाचणार नाही म्हणत मिठी मारली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.