रविवार विशेष
आपल्याकडे बऱ्याचदा नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती असते. एखादे काम, एखादी गोष्ट ध्येय, चिकाटीने करण्यापेक्षा त्यातील उणिवा शोधण्यावर अधिक भर असतो. अशावेळी फिलिपाईन्स देशातील रिहा बुलोस प्रत्येकाने डोळ्यासमोर आणावी, तिची नेमकी काय कहाणी आहे हे आजच्या रविवार विशेष मध्ये आपण पाहुयात…

2019 हे वर्ष रिया बुलोज या चिमुकलीच्या नावावरच बहुदा कोरले गेले, त्यावेळी अकरा वर्षाची होती रिया…! लहानपणापासूनच धावण्यात प्रचंड गती असलेली ही मुलगी तशी अत्यंत गरीब घरातील! फिलिपाईन्स मधील ईलिलियो स्कूल स्पोर्ट्स ॲथलेट या अंतरशालेय धावण्याच्या स्पर्धेत तिने भाग घेतला. ती जिंकली देखील मात्र तिच्या बुटाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले..कारण रियाची परिस्थिती अत्यंत बेताची; म्हणजे तिच्या वडिलांना तिला बूट घेऊन देणे इतपतही पैसे नव्हते. मग शालेय स्पर्धेत धावायचे कसे?
बूट तर नव्हतेच, पण धावायची जिद्द मात्र होती. मग तिने त्यावर देशी जुगाड शोधला आणि एक अफलातून बूट तयार केला. जखमासाठी आपण वापरतो, त्या बँडेजच्या मदतीने तिने टाचा आणि तळव्यांना विशिष्ट पद्धतीने बँडेज बांधले आणि त्या बँडेजवर स्वतःच तिने एक लोगो देखील काढला. अकरा वर्षाच्या या चिमुकलीने शोधलेल्या या अफलातून आयडियाला फक्त फिलिपाईन्स नव्हे तर संपूर्ण जगभरातून कोट्यावधी लोकांनी कौतुकाचा सलाम केला.
रियाने फक्त बूट तयार केला नव्हता, तर रिया धावत राहिली आणि तिने ४०० मीटर, ८०० मीटर आणि १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेत चक्क सुवर्णपदक जिंकले. इच्छा तिथे मार्ग असतो आणि ध्येय, चिकाटी असेल तर काहीही अशक्य नसते. पंखों से उडान होती है हे जरी खरे असले तरी होसला बुलंद असला पाहिजे, तर आपण काहीही करू शकतो ही गोष्ट जगापुढे तिने आणली.
ही कहाणी जगापुढे येण्यामागे रियाचे प्रशिक्षक प्रेडिरीक व्हेलिनझुएला हे यातील महत्त्वाचे ठरले. त्यांनी त्यांच्या फेसबुक वर रियाचा पायाचा फोटो प्रसिद्ध केला आणि रियावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. बास्केटबॉल स्टोअर चे मालक जेफ कारिअसो यांनी तिला बूट भेट दिला.