शिरूर : महान्युज लाइव्ह
चोरीच्या मोबाईलचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक तपास केला अन् दोन परराज्यातील चोर जाळ्यात अडकलेच परंतु चोरीचे ३० मोबाईल अन् दोन लॅपटॉपही जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात १० चोरीचे गुन्हेही दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत मयूर पवार यांचा मोबाइल व लॅपटॉप चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.
या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार सौंदराजन गोविंदा ( वय २० ), बालाजी सल्लापुरी ( वय २३ ) दोघेही रा.तामिळनाडू व सध्या रा. पेरणे, ता.हवेली या दोघांना ताब्यात घेतले.यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी वाघोली,लोणीकंद,कोरेगाव भीमा,शिक्रापूर, सणसवाडी,रांजणगाव आदी भागात चोऱ्या केल्याचे पोलिसांना तपासात सांगितले.पोलिसांनी आरोपींकडून ३० मोबाईल,दोन लॅपटॉप असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक शेळके,सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे सहायक पोलिस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, सागर कोंढाळकर यांनी केला.