मुंबई : महान्यूज लाईव्ह
‘ ताबडतोब किव्ह शहर सोडा, जे काही साधन मिळेल ते वापरा, पण किव्ह सोडा. ‘असा निर्वाणीचा इशारा भारताच्या युक्रेनमधील दुतावासाने युक्रेनची राजधानी किव्हमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना दिलेला आहे.
प्रचंड संख्येने रशियन फौज किव्ह शहराकडे येते आहे. सॅटलाईट माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रात २५ किमी लांब अशी रशियन सैन्याच्या वाहनांची रांग दिसते आहे. हे सैन्य किव्हपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असल्याचे दिसते आहे. हे सैन्य शहराच्या आसपास पोचल्यावर तिथे भयंकर लढाईला सुरुवात होणार हे नक्की आहे. त्यामुळेच भारतीय दुतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना हा इशारा दिलेला आहे.
परंतु भारतीय विद्यार्थ्यांपुढेही फारसे पर्याय नाहीत. रेल्वेस्टेशनवर प्रचंड गर्दी आहे. यातही युक्रेनियन आणि युरोपीय नागरिकांना प्राध्यान्याने रेल्वेत जागा दिली जात असल्याच्या घटना घडत आहेत. या अफरातफरीमध्ये इतर वाहने मिळण्याची शक्यता कमी होत आहेत. किव्ह सोडण्याची धडपड सगळेच करताना दिसत आहेत. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांपुढील अडचणी वाढलेल्या आहेत.
या स्थितीमध्ये केंद्रसरकारपुढेही सर्व भारयीय विद्यार्थांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आव्हान आहे.