महान्यूज लाईव्ह टीम
खासदार शरद पवार तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून व गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रमेश भोईटे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले योजना तसेच अनंत आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी, ऍन्जिओग्राफी व बायपास सर्जरीचे आयोजन बारामती येथे करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेत मोफत शस्त्रक्रिया करून घेतल्या. पण सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न उपस्थित झाल्याने अनेक नागरिक या शिबिराचा लाभ घेऊ शकले नाहीत. अशा नागरिकांनी या शिबिराचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती.
नागरिकांनी केलेल्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आता या शिबिराच्या कालावधीत तब्बल एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे. १२ जानेवारी रोजी संपणाऱ्या या शिबिराचा कालावधी एक महिन्याने वाढवून आता १२ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आला आहे. मागील ४ वर्षात शिबिरांतर्गत २ हजार ९५६ नागरिकांच्या ऍन्जिओग्राफी करण्यात आल्या आहेत. तसेच १००९ अँजिओप्लास्टी, ३८२ बायपास तर ८० हार्ट सर्जरी करण्यात आल्या आहेत. या शिबिराचा कालावधी वाढवल्याने आणखी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.