संदीप मापारी पाटील
लोणार : महान्यूज लाईव्ह
शेगाव पंढरपुर राष्ट्रीय महामार्गावर लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील बसस्थानकासमोर आपे रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यु तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
काल २ जानेवारीला रात्री ही घटना घडली. वडगाव तेजन वरून लोणार कडे येत असलेला अॅपे रिक्षा वडगाव तेजन येथील बसस्थानकासमोर येत असताना लोणारवरून
सुलतानपुरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या मध्ये रिक्षा चालक मालक असलेले तुकाराम ज्ञानबा सोनुने ( वय ३५ वर्ष, रा. देऊळगाव वायसा ) व त्याच गावचे रहिवासी असलेले
शिवानंद सोनुने ( वय ३५) वैभव लक्ष्मण सोनुने (२४ ) हे गंभीर जखमी झाले असुन या घटनेची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिव पाटील तेजनकर यांनी लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांना दिली. घटनेचे गांर्भीर्य ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी पोलीस वाहनासह पोहेका बन्सी पवार , पो. का. ज्ञानेश्वर निकम , पो. का. भाउसाहेब मोरे, चालक हरीभाउ ढाकणे ,यांनी घटनास्थळी पाठवले. पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रूग्नालय लोणार
येथे आणले. त्यावेळी रिक्षा चालक मालक तुकाराम सोनुने हे मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगीतले. इतर जखमीना जालना येथे हलविण्यात आले. पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांचे मागदर्शनाखाली पोहेका अरुण खनपटे व पोलिस काॅन्स्टेबल ज्ञानेश्वर निकस करीत आहेत.