माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
‘भारत की आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने जिल्हा परिषद पुणे आणि भोर पंचायत समितीच्या सयुंक्त विद्यमाने नसरापूर ( ता. भोर ) मध्ये बेरोजगार तरुणासाठी विभागीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे व भोर पंचायत समितीचे सभापती लहुनाना शेलार यांनी दिली आहे.
भोर, पुरंदर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील व पंचक्रोशीतील सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना रोजगार मिळावा यासाठी मंगळवारी दि. २८ रोजी नसरापूर येथील कुंभारकर कार्यालयात येथे जिल्हा परिषद पुणे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्फत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजने अंतर्गत रोजगार मिळणार असल्याने जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घेण्याचे आवाहन सभापती लहुनाना शेलार यांनी केले आहे.
नोकरीसाठी वयाची अठरा वर्ष पूर्ण आवश्यक असून दहावी आणि बारावी पास, आयटीआय, पॉलिटेक्निक, डिप्लोमा तसेच पदवीधर युवकयुवती करीता रांजणगाव, भोसरी, हडपसर, पिरंगुट, चाकण, पिंपरी चिंचवड, जेजुरी, वेळू, शिरवळ, खंडाळा या एमआयडीसी कंपनीमध्ये रोजगार मिळविण्याची संधी असून मुलाखतीला येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या मुळ व झेरॉक्स प्रति सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती भोर, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाशी संपर्क साधावा.