बारामती येथील विवाहसोहळ्यामध्ये महिला व बालकांशी संबंधित कायद्याची पुस्तके वाटून नवा आदर्श
एड. तुषार झेंडे पाटील, सदस्य महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषद
विवाह.. मग तो कोणत्याही धर्मातील जातीतील असो; तेथील साता जन्माच्या गाठी त्या पती-पत्नी सह त्या कुटुंबातील आयुष्य समृद्ध करणाऱ्या असतात.. त्या गाठी अधिक दूर करण्यासाठी ऋणानुबंधाची नाती जपण्याचा उपक्रम वरपक्ष, वधूपक्ष नेहमीच करत आला आहे. हा लग्न समारंभ चिरंतन असावा; संस्मरणीय असावा यासाठी विविध क्लुप्त्या देखील करताना अलीकडे आपल्याला लोक पाहायला मिळतात, पण बारामती मध्ये एक अतिशय आदर्श देण्याजोगी घटना घडली.
नाझनीन आणि साहिल यांचा विवाह सोहळा अनुसया गार्डन मंगल कार्यालय, गुनवडी, बारामती येथे पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये नवरी मुलीचे वडील ॲड. ए. एल. शेख आणि मुलाचे वडील हाजी इजाज कादर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पुष्पगुच्छ, नारळ, हार, फटाके यांचा अनावश्यक खर्च टाळून महिला आणि बालकांशी संबंधित कायद्यांची सव्वा लाख रुपये किंमतीची 500 पुस्तके लग्नात येणाऱ्या सर्वांना भेट म्हणून दिली.
त्यामागील त्यांचा उद्देश असा आहे की, समाजामध्ये महिला व बालकांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने महिला व बालकांसाठी अनेक कायदे केले आहेत, परंतु त्या कायद्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होत नाही. तरी या लग्न सोहळ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना महिला व बालके यांच्या कायद्याची माहिती व्हावी व महिला व बालकांना कायद्याने मिळणारे अधिकार सर्वसामान्य नागरिकांना समजावेत.
त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांनी व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. हा विवाहसोहळा कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून पार पाडण्यात आला.