मुंबई : महान्यूज लाईव्ह
आंध्र प्रदेशात परदेशातून आलेल्या ६० जणांपैकी ३० जणांचा आंध्रप्रदेश राज्य सरकार शोध घेत आहे. राज्यातील विशाखापट्ट्णम विमानतळावर गेल्या १० दिवसात ६० विदेशी प्रवासी उतरले होते. त्यापैकी ३० प्रवासी विशाखापट्ट्णम येथेच आहेत.
बाकीचे ३० प्रवासी राज्याच्या वेगवेगळ्या भागात निघून गेले आहेत. त्यांचा शोध सध्या राज्य सरकारकडून घेतला जात आहे. यापैकी काहीजण फोन उचलत नसल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. या प्रवाशांना शोधून त्यांची आरटीपीसीआर चाचणी राज्य सरकार करणार आहे.
यापैकी ९ प्रवासी दक्षिण आफ्रिकेहून आलेले आहेत. याखेरीज देशभरात कर्नाटकात दोन ओमिक्रॉन कोरोना संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत. राजस्थानात दक्षिण आफ्रिकेवरून परतलेल्या ४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. हा संसर्ग ओमिक्रॉनचा आहे का नाही, हे शोधण्यासाठी तपासणी सुरू आहे.