महाड : महान्यूज लाईव्ह
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविद ६ डिसेंबर रोजी किल्ले रायगड येथे येत आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यात उभारण्यात येणाऱ्या हेलिपॅडच्या ठिकाणाला शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे.
राष्ट्रपतींसाठी रायगड किल्ल्यावर होळीचा माळ येथे हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी हेलिपॅड उभारल्यास हेलिकॉप्टर उतरताना उडणारी धुळ होळीच्या माळावर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडण्याची शक्यता आहे. तसेच होळीचा माळ हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. त्यामुळे येथे हेलिपॅड उभारू नये अशी या संघटनांची मागणी आहे.
कोकण कडा मित्र मंडळ, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात महाडच्या प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिलेले आहे.
राष्ट्रपतींबद्दल आदर आहे, परंतू दुर्गदुर्गेश्वर रायगडावर हेलिकॉप्टर उतरवून शिवभक्तांची मने दुखवू नका तसेच चुकीचा पायंडा पाडू नका. आपल्याबद्दल आदर आहे पण आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठे नाही. छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत आणि यावर कोणीही धुळ उडविण्याचा प्रयत्न करू नये असे यासंदर्भातील फेसबुक पोस्टमध्ये म्हणले आहे .