बारामती : महान्यूज लाईव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल ( गुरुवारी ) दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे. १२ नोव्हेंबरपासून ते दवाखान्यात होते. त्यांच्यावर मान आणि पाठीच्या दुखण्याबाबत उपचार सुरू होते. याच दुखण्यासाठी त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यांच्यावर फिजिओथेरपीव्दारे उपचार सुरू होते. आता ते रुग्णालयातून घरी आले असले तरी अजून काही आठवडे त्यांना फिजिओथेरपी उपचार करावे लागणार आहेत.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री निवासात न राहता त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी राहतात. मात्र रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या वर्षा या निवासस्थानी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.
२२ डिसेंबर रोजी ते विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनास प्रत्यक्ष उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत ते वर्षावरूनच कामकाज पाहतील, तसेच कोणतेही दौरे करणार नाहीत असे समजते.
मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या फाईलवर सह्या केल्याचे समजते, त्यापैकी एक फाईल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या निलंबनाची होती. त्यांच्याशी चर्चा करून काही विषयांबाबत आदेश काढण्यात आलेले आहेत. परंतू नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, घरबांधणीबाबत काही फाईल्स त्यांच्या सहीच्या प्रतिक्षेत आहेत.