मुंबई: महान्यूज लाईव्ह
मुंबई : आर्यन खान याच्यावरील ड्रग्स कारवाईत संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एन. सी.बी.ने आज दिवसभर तीन वेळा पत्रकार परिषदेत रद्द केल्या. आजपर्यंत राज्याचे मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर थेट आरोप करत होते, परंतु या प्रकरणातील साक्षीदार आणि पंच असलेल्या किरण गोसावी याच्या अंगरक्षकाने केलेल्या मोठ्या गौफ्यस्फोटानंतर आज राज्यभर दिवसभरात फक्त आर्यन खान केस आणि समीर वानखेडे हेच चर्चेत राहिले.
दरम्यान अंगरक्षकाने केलेल्या या आरोपात संदर्भात चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी एन सी बी ने पत्रकार परिषद आयोजित केली होती, मात्र दिवसभरात तीन वेळा पत्रकारांना वेगवेगळ्या वेळा करून तीनही वेळा या पत्रकार परिषदा रद्द करण्याची नामुष्की एनसीबी वर आली.
तथाकथीत पंच आणि पुणे पोलीस दलाने फरार घोषित केलेला आरोपी किरण गोसावीचा अंगरक्षकाच्या आरोपानंतर एनसीबी कोमात गेली असल्याचे दिसत होते. मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज सापडल्या प्रकरणी आर्यन खान सह आठ जणांना एनसीबीनं ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अटक केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोपसत्र सुरु केलं होतं. त्यात आज एनसीबीचा आर्यन खान प्रकरणातील पंच व किरण गोसावी याचा अंगरक्षक प्रभाकर साळी यानं धक्कादायक आरोप केले.
प्रभाकर साहिलचे आरोप काय आहेत?
आज प्रभाकर साईल याने एक व्हिडिओ जारी केला. हा प्रभाकर साहिल एनसीबी च्या प्रकरणात साक्षीदार असून पहिल्या क्रमांकावरचा तो साक्षीदार आहे. यामध्ये प्रभाकर साहिल म्हणतो, ‘मी मुळचा मुंबईचा. 22 जुलै 2021 पासून मी किरण गोसावी यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून कामास रुजू झालो. 30 जुलै रोजी मी ठाण्यात हिरानंदानी परिसरातील विजयनगर भागात गोसावी यांच्याकडे राहण्यासाठी गेलो होतो. आठ सप्टेंबर मध्ये ते घर सोडून आम्ही वाशी सेक्टर 28 ला शिफ्ट झालो.
27 सप्टेंबर रोजी किरण गोसावी अचानक अहमदाबादला निघून गेले. 1 ऑक्टोबर रोजी रात्री त्याचा अचानक फोन आला. आम्ही अहमदाबाद वरून बाय रोड निघालो असून तू रेडी रहा असे मला गोसावी यांनी सांगितले. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता किरण गोसावी यांनी सीएसटी येथे पोचण्यास सांगितले. त्यांनी दिलेली लोकेशन हे एन सी बी चे ऑफिस होते.
मी गेलो तेव्हा तेथे गोसावी यांची वर मीटिंग सुरू आहे असे मला सांगण्यात आले. सकाळी पावणे दहाच्या दरम्यान अधिकारी खाली आले. ते ईनोवा गाडी मध्ये बसले. त्यानंतर समीर वानखेडे व इतर अधिकारी बसले आणि सरकारी गाडीतून निघून गेले. नंतर सव्वाबाराच्या सुमारास गोसावी खाली आले. आपल्याला फेंकी घ्यायचा आहे असे त्याने सांगितले. आम्ही फ्रॅंकी व पाण्याच्या बाटल्या घेऊन चालत ग्रीन गेट कडे गेलो.
तिथे गेल्यावर मला कळले की इथुनच क्रूझ कडे जाण्यासाठी प्रवेश दिला जातो. आम्ही विमानतळावर जातो, त्याप्रमाणे बोर्डिंगच्या ठिकाणी गेलो. तिथे सगळे अधिकारी बसले होते. समीर वानखेडे यांना किरण गोसावींनी फ्रँकी दिली. मी इतरांना दिली. त्यानंतर मला ग्रीन गेट कडे उभारण्याची सूचना केली. आम्ही काही वेळाने फोटो पाठवतो, ती व्यक्ती आत आली की ओळखून मला सांगायचं असे ते म्हणाले.
गोसावी यांनी मला काही वेळातच फोटो पाठवले . मी सर्च करू लागलो. मास्कमुळे अडचणी येत होत्या, पण त्याच वेळेस पांढरा टी शर्ट घातलेल्या एका व्यक्तीला मी ओळखलं. त्याची माहिती मी त्यांना दिली. नंतर त्यांचा मला मेसेज आला, आम्ही त्याला पकडला आहे व नंतर 13 जणांना पकडल्याचा मेसेज मला केला.
संध्याकाळी मी काही वेळ बाहेरच थांबलो. तेव्हा रात्री साडेदहा पावणेअकराच्या सुमारास मी पुन्हा गेलो. त्यावेळी मला समीर वानखेडे दिसले. केबिनमध्ये मला आर्यन खान ही दिसला. त्याच्या सोबत आणखी सात-आठ जण होते. मी गुपचूप आर्यन खान चे फोटो काढले. साडेअकरा पावणे बाराच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो. किरण गोसावी आर्यन खानसह गाडीत बसून एनसीपी च्या कार्यालयात गेले.
मी सुद्धा चालत गेलो. पावणे एकच्या सुमारास मला वर बोलवून पंचनामा साक्षीदार म्हणून सही करण्यास सांगितले. वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर मला सही करायला लावली. आठ-दहा कोऱ्या कागदावर सही घेण्यात आली. आधार कार्ड मी व्हाट्सअप वर पाठवून दिले. अडीच पावणेतीन आम्ही खाली उतरलो. त्यावेळी किरण गोसावी यांना सॅम नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्यांची सुरू होती.
पहाटे साडेचार वाजता गोसावी आणि सॅम एका गाडीत आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे लोअर परेलला एका पुलाखाली थांबलो. तिथे आमच्या गाडीच्या मागे निळ्या रंगाची मर्सिडीज आली. त्या गाडीमध्ये शाहरुख खानची मॅनेजर बसली होती. तिघांमध्ये मीटिंग झाली. मला कळलं नाही. मात्र गाडीतून त्यांनी फोन केला. त्यावेळी 25चा बॉम्ब टाक. 18 पर्यंत डन करू, 8 वानखेडे साहेबांना जातील, 10 आपण वाटून घेऊ असे त्यांचे संभाषण झाल्याची मी ऐकले.
त्यानंतर सुमारे साडे पाचच्या सुमारास आम्ही तिथून निघालो. मंत्रालयाच्या समोर जाऊन उभे राहिलो. नंतर पूजा फोन नही उठा रही है असं म्हणून स्याम चा फोन आला. जाऊ दे आम्ही घरी जातो म्हणून गोसावी यांनी म्हटल्यानंतर आम्ही तिथून निघालो. मी आंघोळ केली. रात्रभर झोपलो नव्हतो.
सरांनी मला कॉल करून पुन्हा महालक्ष्मी ला जाण्यास सांगितलं. तिथे एक गाडी येईल त्यामधून तुला पन्नास लाख रुपये घ्यायचे आहेत असे मला गोसावींनी सांगितले. पांढऱ्या रंगाच्या त्या गाडीतून पैसे घेऊन घरी गेलो. तिथे त्यांची बायको होती. मी त्यांना बॅग दिली. त्या बॅग घेऊन निघून गेल्या. मला घरी थांबायला सांगितले. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मला वाशी ब्रिज कडे पुन्हा बोलावले.
इनॉर्बिट मॉल जवळ मला माझ्या हातात पुन्हा पैशाची बॅग दिली. चर्चगेटला जाऊन पुन्हा स्याम यांना ते पैसे दे असे ते म्हणाले. सॅमकडे गेल्यावर आतमध्ये 38 लाख रुपये होते. मला त्याबाबत काहीच माहिती नसल्याने मी गोसावीशी बोलून घे असे म्हणालो. आणि गोसावी यांच्यात बोलणं झालं बाकीचे बारा लाख दोन दिवसात देतो असे सांगितले. त्यानंतर मी माझ्या घरी आलो. नंतर मी गोसावींचे व्हिडिओ पाहिले. आज मी हा व्हिडीओ तयार करतो आहे. कारण समीर वानखेडे यांची मला आता भीती वाटू लागली आहे. त्यांची भीती वाटत असल्याने मी हे सगळे तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
महा विकास आघाडी झाली सक्रिय…
प्रभाकर याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर लागलीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करुन चौकशीची मागणी केली. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील समीर वानखेडे ची चौकशी करा अशी मागणी केली.
समीर वानखेडे यांनी फेटाळले आरोप
दरम्यान तीन वेळा पत्रकार परिषद रद्द केल्यानंतर समीर वानखेडे काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी संध्याकाळी बोलले. त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळून लावत पोलीस महासंचालकांना एक पत्र दिले. ज्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचबरोबर मला कामावरून काढून टाकण्याची धमकी मिळत आहे, त्यामुळे माझ्या संदर्भातील काही माहिती असेल तर ती वरिष्ठांकडे पाठवा’ अशी विनंती समीर वानखेडे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना भेटून पत्र देऊन केली.