बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सहा वाजल्यापासूनच बारामती शहराच्या विविध विकासकामांची पाहणी सुरू केली. यानंतर खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाचे उदघाटन करताना अधिकाऱ्यांना त्यांनी कानपिचक्या दिल्या. माझ्या गतीने कामे करा, नुसती कारणे सांगू नका अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. तर बारामतीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय असलेला कचरा डेपो बारामतीतून हलवणारच असे अजितदादांनी स्पष्ट करीत जळोचीकरांच्या टाळ्या घेतल्या.
आज अजितदादांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी सुरू केली. त्यामध्ये त्यांनी सध्या सुरू असलेल्या कामांबरोबरच उदघाटनेही केली. यामध्ये खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाचे, अंबिकानगर येथील मंदिराचाही समावेश होता. खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाचे उदघाटन करतेवेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कामे गतीने करण्याबाबत कानपिचक्या दिल्या.
अंबिकानगर येथील मंदिराचे लोकार्पण करतेवेळी स्थानिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कचरा डेपोबाबत अजितदादा काय सांगणार याची उत्सुकता सर्वांना होती. अजितदादांनी लोकार्पण केल्यानंतर लागलीच सभेचा ताबा घेतला आणि त्यांनी कोणीही काही न सांगताच या मुद्द्याला हात घातला.
ते म्हणाले, मला येथील कचरा डेपो बाहेर न्यायचा आहे. मात्र थोडे थांबा. कोठे बाहेर न्यायचा म्हटले की, लगेच चर्चेला सुरवात होते. मात्र मला हा डेपोही बाहेर न्यायचा आहे आणि इतरांनाही नाराज करायचे नाही. त्यामुळे नेमके काय करायचे आणि ओला, सुका कचऱ्यासंदर्भात नवीन तंत्रज्ञान काय वापरायचे याविषयी विचार सुरू आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत कचरा डेपो हलवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे त्याची काळजी करू नका.
यावेळी स्थानिक नगरसेवक अतुल बानगुडे, आशा माने, निवृत्त कार्यकारी अभियंता, संभाजीराव जगदाळे यांच्यासह नगरपरीषदेचे गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदींसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.