बारामती : महान्यूज लाईव्ह
एरवी एखाद्या वास्तू, दुकानाचे उदघाटन म्हटले की, किती जामानिमा असतो?… किती तयारी असते यजमानांची?… संध्याकाळी चारची वेळ असेल तर कधी सात वाजतात कोणालाच कळत नाही.. मग आकाशात तारे जमा होताना दारुगोळ्याच्या आतषबाजीने आसमंत उजाळून जायला हवा.. मग छोटीशी मिरवणूक व्हावी.. आणि मग त्यानंतर आरामसे एक सभा व्हावी… अलिकडच्या काळात नेत्यांच्या बाबतीत हे सर्रास पाहायला मिळते का?…
अर्थात बारामती त्याला अपवादच आहे बरं का… इथे भल्या पहाटेच उदघाटने होतात… तिथे मग गर्दीची अपेक्षा कोणाचीच नसते.. ना नेत्याची.. ना यजमानाची.. अट फक्त एकच, नेता वेळेवर येतोच… यजमान फक्त जाग्यावर असायला हवा…!
आज बारामतीत नेहमीप्रमाणेच झुंजूमूंजू होण्याआधीच पहाटेच्या अंधारात उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा काफिला पणदरे येथे पोचला. तेथे पेट्रोलपंपाचे उदघाटन करून हा काफिला बारामतीत पोचला. आणि सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तब्बल दहा ठिकाणची पाहणी, तीन ठिकाणची उदघाटने पार पडली. या ठिकाणी साताऱ्यातील एक पदाधिकारी आले होते.. त्यांच्या आपसूक तोंडातून शब्द बाहेर आले.. काही खरं नाही बाबा… अजितदादा होणं काही सोप्प हाय व्हय?
अजितदादांची विकासकामे पाहण्याची वेळ असते, पहाटेची.. आता बारामतीकरांना याची सवय झालेलीच आहे.. पण पुणेकरांनाही झाली आहे. आज सकाळी सात वाजता पणदरे येथून आल्यानंतर अजितदादांनी मोरगाव रस्त्यावरील जामदार रस्ता, निरा रस्ता, फलटण रस्त्यासह चार ठिकाणच्या रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे भूमीपूजन केले.
त्यानंतर कऱ्हा नदीवरील सुशोभीकरण पाहिले. गॅबियन पध्दतीच्या भिंतीची पाहणी केली. त्यानंतर मेडद येथील नियोजित आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर निरा डाव्या कालव्याच्या सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून भऱाव्याच्या दोन्ही बाजूंना बहावा व महोगनीची झाडे लावली जाणार आहेत, त्याचे वृक्षारोपण करून या कामाची सुरवात अजितदादांनी केली.
यानंतर बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाचे उदघाटन केले. या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या गतीने कामे करण्याची सूचना केली. तेथे त्यांनी भाषण केले. अर्थात तोपर्यंत निम्मे अधिकारीच तेथपर्यंत पोचले होते. काही अधिकारी अजूनही रस्त्यातच होते. त्यानंतर दादांनी जळोची हद्दीतील अंबिकानगर येथील सार्वजनिक मंदिराचे लोकार्पण केले. तेथे त्यांनी भाषणही केले. त्यानंतर दादांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. तेथील ऑक्सिजन प्लॅंटचे उदघाटन केले.
त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातील आढावा बैठकीकडे त्यांनी प्रयाण केले. येथे येताच त्यांनी रत्नानिधी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दिल्या जात असलेल्या ४५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण त्यांनी केले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या मतदारसंघातील नागरिकांना व्यक्तीशः भेटून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. निवेदने स्विकारली व त्यानंतर कोरोनाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी संध्याकाळी चार वाजता सोमेश्वर येथील सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अचानक मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची धांदल उडाली.. सर्वांना निरोप देऊन संध्याकाळी मेळाव्याची तयारी करावी लागणार होती…!