बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील भक्ताच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी सातारा जिल्ह्यातील सालपे घाटात काल ताब्यात घेतलेल्या मनोहर मामाला आज बारामतीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश ए. जे. गिऱ्हे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बारामतीतील शशिकांत खरात यांच्या वडिलांच्या असाध्य कॅन्सर रोगावर उपचार करतो, त्यासाठी बाभळीचा झाडपाला खावा असे सांगत अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले यांना काल बारामती पोलिसांनी व पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्याला रात्री अटक करण्यात आली. आज सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यादरम्यान झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी आरोपी मनोहर भोसले याच्या वतीने अडवोकेट विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला तर पोलिसांच्या वतीने तपास अधिकारी महेश ढवाण यांनी बाजू मांडली
टी-शर्ट नाईट पॅन्ट वर मनोहर भोसले
आतापर्यंत पांढर्याशुभ्र खादीमध्ये पाहिलेल्या मनोहर भोसले यांनी आज न्यायालयात येताना टी-शर्ट आणि नाईट पॅन्ट परिधान केला होता. त्यामुळे अनेक जण त्याला ओळखू शकले नाहीत.