कृषी संजीवनी मोहिमेला दौंड तालुक्यात मोठा प्रतिसाद..
दौंड : महान्यूज लाईव्ह
शेतकरी बांधवानी कमी क्षेत्रात शेतातील पिकांचे योग्य नियोजन केल्यास आणि सध्या बाजारामध्ये जो माल विकला जातोय किंवा ज्या शेतमालास मागणी आहे, अशीच पिके शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवला पाहिजे. शेतीतील उत्पन्नात शाश्वतता आणली पाहिजे,असे मत शेती अभ्यासक महेश रुपनवर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या कृषी संजीवनी मोहिमेला दौंड तालुक्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
राज्यामध्ये २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी संजीवनी मोहीम राबवून शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती आणि मार्गदर्शन करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार दौंड तालुका कृषी विभागाने या मोहीमेची सुरवात पाटस येथून केली होती. या मोहीमेस तालुक्यात ठिकठिकाणी शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत असे सूत्रांनी सांगितले. गलांडवाडी येथे नुकताच या मोहीमे अंतर्गत कार्यक्रम पार पडला.
यावेळी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर म्हणाले की, शेतामध्ये एकाच प्रकारचे पिक घेण्यापेक्षा विविध पिकांचा विचार केला पाहिजे. शेतात आंतरपिके घेतली पाहिजे म्हणजे शेतातील उत्पन्नाचे धोके कमी करण्यास मदत होईल. देशात आपणास सर्व संघटना पाहायला मिळतात परंतु शेतकरी हा घटक विखुरलेला पाहायला मिळतो, काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवानी एकत्र आले पाहिजे.
शेतकऱ्यांनी उत्पादक कंपन्यांमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. यामुळे शेतकरी सुद्धा व्यावसायिक होऊन स्वतच स्वतःच्या मालाचे विपणन करू शकतो. त्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगातील संधी शोधून, शेतमालाचे होणारे नुकसान टाळून अधिक उत्पादन घेवू शकतो. त्याबरोबर गावा गावात,वाड्या वस्त्यांवर शेतकरी गट स्थापन झाले पाहिजेत. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, विकेल ते पिकेल योजनेंतर्गत शेतकरी गटांना थेट विक्री व्यवस्थेतून गटांना होणारे फायदे, संत सावतामाळी रयत बाजार अभियान, स्मार्ट योजना अशा अनेक बाबींबाबत मार्गदर्शन रूपनवर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गर्शन केले.
कृषि पर्यवेक्षक राजु पवार यांनी कृषि यांत्रिकीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन व शेतकरी बांधवांचे शंकांचे निरसन केले. कृषि सहाय्यक संध्या आखाडे यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतीशाळेची संकल्पना याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच गजानन कदम, दौंड कृषि उत्पन बाजार समितीचे संचालक उत्तम ताकवले, माजी सरपंच गजानन कदम, कृषि सहाय्यक सचिन लोणकर, व्ही.बी बारवकर, एस एन घनवट, विजय पवार, लक्ष्मण शेंडगे, संजय कदम, किशोर छाजेड, सतीश शितोळे व शेतकरी बांधव उपस्थित होते.