मुंबई : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, आज त्यांनी ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आठ दिवसांनंतर ते पूर्ववत आपल्या कामास सूरवात करतील.
अजितदादांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी त्यांना ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान दादांच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून राज्यभरातील दादांच्या चाहत्यांनी प्रार्थना केल्या होत्या.
कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतरही अजितदादा दिवसभर व रात्री उशीरापर्यंत कामात व्यग्र होते. राज्यभर त्यांचे दौरेही सुरू होते, तसेच ते जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या सदैव संपर्कात होते. सततची दगदग झालेली असतानाच त्यांनी पुणे व सोलापूरचा महापूरातील नुकसान पाहणीचा दौरा केला. त्यानंतर त्यांना ताप आला.मात्र त्यावेळी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती.
त्यानंतर चार दिवसांनी केलेल्या तपासणीत मात्र दादांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यावरून दादांना ब्रीच कॅण्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. त्यांना डिस्चार्ज करण्यात आले. आठवडाभराच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून त्यानंतर दादा पूर्ववत कामास सुरवात करतील. यासंदर्भात सुप्रियाताईंनी त्यांच्या सोशल मिडियात ही गुड न्यूज दिली आहे.











