इंदापूर : महान्यूज लाईव्ह
साखर आयुक्तांच्या आदेशानुसार गळीत हंगाम सुरू होताच छत्रपती कारखान्याचा ५० बेडचा कोविड सेंटरचा कक्ष सर्व सुविधांनी सज्ज झाला आहे.
येथील छत्रपती मंगल कार्यालयात ४५ आयसोलेशन बेड व ५ बेड ऑक्सिजनयुक्त सुविधांनी सज्ज करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून याची तयारी सुरू होती. आज कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह कोरोना कक्षाची संकल्पना ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात आणली ते बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांनी याची पाहणी केली. यावेळी भवानीनगर येथील यशश्री हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. राकेश मेहता यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. मेहता यांच्यासह स्थानिक डॉक्टरांनी या ठिकाणी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे.
किरण गुजर यांनी या कक्षाची रचना ही बारामतीतील कोविड सेंटरप्रमाणे केली असून कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी साखर आयुक्तांच्या आदेशानुसार ही सुविधा सज्ज करण्यात आली आहे. कारखाना कार्यस्थळी आता मजूर येऊ लागले असून त्या पार्श्वभूमीवर ही सुविधा करण्यात आल्याचे सांगितले.











