सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करून नंतरच्या काळात राष्ट्रवादी सोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर पाहिले पाहिले आणि अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात जोरात शाब्दिक फटकारा दिला..’व्यासपीठावर आज जे बसलेत, तेवढ्यांनी जरी विधानसभेला मामाचं काम केलं असतं, तरी समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाला असतं!’
इंदापूर विधानसभा निवडणुकीपूर्वी परिस्थिती अशी होती की, कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसू दोन आकडी आमदार देखील येणार नाहीत. आणि त्याच काळात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून भाजपवासी झाले आणि जेव्हा दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळाली, तेव्हा राष्ट्रवादीमध्ये सरळसरळ दोन गट पडले. यातील एक गट थेट हर्षवर्धन पाटील यांच्या व्यासपीठावर जाऊन बसला आणि त्यांचा प्रचार करत राहिला.
मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेने चमत्कार घडवला आणि राज्यातील जनतेने देखील राष्ट्रवादीच्या पारड्यात झुकते माप टाकले. त्यानंतरच्या काळात राज्यात अनपेक्षित अशी राजकीय गणिते घडली आणि सत्तांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाआघाडी सत्तेवर आली. याच काळात दत्तात्रय भरणे हे मंत्री झाले आणि त्यानंतर भरणे यांच्या अनेक कार्यक्रमाला निवडणुकीच्या काळात विरोधात काम केलेले पदाधिकारी व्यासपीठावर येऊ लागले.
आज देखील इंदापुरात कार्यक्रम होत असताना अनेक पदाधिकारी व्यासपीठावर होते. त्याचा संदर्भ घेऊन अजित पवार यांनी त्यांना चांगलीच शाब्दिक फटकारे दिले. अजित पवार यांनी समोर बसलेल्या लोकांना प्रश्न विचारला की, मी जे बोलतोय ते खरे आहे का? आणि समोरून मोठ्या आवाजात ‘हो’ असा आवाज आला. त्यानंतर ते म्हणाले की, मी आज आल्या आल्या व्यासपिठावर सहज नजर टाकली आणि कोण कोण बसले आहेत त्याची माहिती घेतली. मामा ३१०० मतांनी निवडून आले. या साऱ्यांनी जरी विधानसभा निवडणुकीत काम केले असते तरी समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते. मात्र त्यांना असं वाटलं असेल की, भाजपच चांगला आहे. भाजपच निवडणुकीत सत्तेवर येणार आहे. परंतु उलटे घडले आणि सत्ता राष्ट्रवादीची आली. तसे पाहिल्यास माझा फार खोलवर विचार नसतो. त्यामुळे झाले गेले मी देखील विसरून जातो. परंतु ज्या राष्ट्रवादीमुळे हे सारे घडते आहे, त्या राष्ट्रवादीविषयी जर कोणी व्यासपीठावर बोलत नसेल तर ते पूर्ण चुकीचे आहे.
मी देखील उपमुख्यमंत्री असलो तरी राष्ट्रवादी मुळेच आहे, दत्तात्रय भरणे हे देखील मंत्री आहेत ते राष्ट्रवादी मुळेच आहेत आणि यशवंत माने आमदार आहेत ते देखील राष्ट्रवादी मुळेच आहेत. त्यामुळे कोणीही कुठल्याही संस्थेवर पदाधिकारी झाले तर ते राष्ट्रवादी मुळेच आहेत हे अजिबात विसरता कामा नये. काहीजणांनी त्यानंतरच्या काळात देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देखील विरोधात काम केले. एका प्रभागात जरी विरोधात काम केले तरी आज का पॅनल पराभूत होतो हा इतिहास लक्षात घेऊन ही लोक कसे विरोध करतात याचे मला आश्चर्य वाटते असे अजित पवार म्हणाले.










