बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाचा काळ म्हणजे वर्षभर फार जिकीरीचा, चिंतेचा, कामाचा होता.. त्यातही कोरोनायोध्दे असलेल्या आरोग्य कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, आशा, परिचारीकांपासून वाहनचालक, परिचर, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी तर नक्कीच धामधुमीचा होता.. या काळात अनेकांना २४-२४ तास सेवा करावी लागली.. आता वातावरण थोडे निवळले आहे, मात्र या निवळलेल्या वातावरणातही हे कर्मचारी सक्रीय आहेत.. त्यांच्याविषयी समाजाने कृतज्ञता बाळगलीच..पण यंदा प्रथमच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना स्वखर्चाने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून मिठाई वाटली.. ही मिठाई किती रुपयांची होती, त्यापेक्षा त्यामागची भावना कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची ठरली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी कोरोनाच्या काळात न थकता काम केलेल्या कोरोनायोध्दे सहकाऱ्यांप्रती दिवाळी भेट देत कृतज्ञता व्यक्त केली. तसेही समाजात देवाची जागा लोकांनी या आरोग्यदूतांनाच दिली होती. त्याचीच री ओढताना प्रशासनालाही तुमच्याविषयी आदर आहे हे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखवून दिले. आजवर अनेक आरोग्य अधिकारी आले आणि गेले. खुद्द डॉ. भगवान पवार यांनीही यापूर्वी पुणे जिल्ह्यात काम केले आहे, मात्र पहिल्यांदाच ही भेटवस्तू त्यांनी जिल्ह्यातील ५ हजार कर्मचाऱ्यांना दिली.
सर्वत्र कोरोनाचे थैमान असताना जिवाची पर्वा न करता जनसेवेसाठी अहोरात्र झटत असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी सेवा परमो धर्म हीच संकल्पना महत्वाची आहे, या काळात जिल्ह्यातील अनेक आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाले, मात्र तरीदेखील रुग्णसेवा थांबली नाही, ती तशीच अविरत राहीली, त्यांच्याप्रती ही कृतज्ञता असल्याचे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान डॉ. पवार यांनी दिलेल्या या भेटीबद्दल कर्मचाऱ्यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. आरोग्य कर्मचारी पुष्पराज निंबाळकर यांनी अशा प्रकारची भेट पहिल्यांदाच मिळाली असली तरी ही भेट म्हणजे मिठाई नसून ती कौतुकाची, पाठबळाची थाप आहे, वरिष्ठांनी दिलेल्या या प्रतिसादाने कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्या जोामाने काम करण्याची प्रेरणा मिळते असे मत निंबाळकर यांनी व्यक्त केले.










