इंदापूर : महान्यूज लाईव्ह
समाजातील गोरगरीब, वंचित कुटूंबियांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या अंधःकारमय जीवनातील दिपावली सणात आनंदमयी प्रकाश यावा यासाठी लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जयभवानी गड विकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले व उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी पुढाकार घेत प्रतिष्ठानच्या वतीने या गरीब कुटूंबांना मंगळवारी (दि.10) आनंद भेट चे वितरण करण्यात आले. इथुन पुढे दरवर्षी तीन हजार गरजू गरीब कुटूंबास आनंद भेट देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या आनंद भेट चे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, बावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.एन.लातूरे,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, प्रतिष्ठानचे मुख्य मार्गदर्शक प्रदीप गुरव व पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना कामधेनू परिवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे म्हणाले की, ढोले कुटुंबियांनी गरीबीच्या झळा, वेदना सोसल्या आहेत. त्यांनी याची सामाजिक जाणीव ठेवली आहे. राज्यावर कोरोना तसेच नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले. या परिस्थितीत लाखेवाडी परिसरातील शेकडो उपेक्षित, गरीब कुटुंबांना ढोले कुटुंबांच्या या आनंद भेट मुळे गोड घास खाता येणार आहे. एका गरीब कुटुंबातून जन्म घेवून, गरिबांच्या हजारो मुलाबाळांना अद्ययावत शिक्षण प्रणाली देण्याची भूमिका श्रीमंत ढोले यांनी घेतली आहे.
यावेळी जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीमंत ढोले म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याची भूमिका सातत्याने ठेवलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षणात पुढे गेला पाहिजे, यासाठी लातूर पॅटर्न ही संस्था राबवत असून, कमी वयाची संस्था असून देखील राज्यांमध्ये अनेक परीक्षेत प्रथम येण्याचा मान या संस्थेतील विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. कोरोना व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी, गरीब कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. रितीरिवाजाप्रमाणे सालाबादप्रमाणे दिवाळी सण या कुटुंबात साजरा व्हावा या उद्देशाने दिवाळी आनंदभेट उपक्रम राबविला.
या वेळी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी उपस्थितांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे यांनी केले, आभार प्रदिप गुरव यांनी मानले. श्रमिक पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष सुरेश मिसाळ, श्रमिक पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक आबासाहेब उगलमोगले, सरचिटणीस व सहसंघटक इम्तिहाज मुलाणी, श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य गणेश कांबळे, अहमद शेख, बाळासाहेब सुतार, दिपक शिंदे तसेच पत्रकार धनंजय कळमकर, दीपक खिलारे, जितेंद्र जाधव, तात्याराम पवार, आदम पठाण व इतर पत्रकार उपस्थित होते.











