भिमा पाटस कारखान्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन
दौंड : महान्यूज लाईव्ह
भिमा पाटस कारखान्यावर हजारो शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा प्रपंच सुरु आहे. सलग दोन वर्षे कारखाना बंद राहिला तर सभासद आणि कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल थोडीफार आस्था असेल तर कारखाना सुरु करण्याबद्दल विचार करावा अशी मागणी माजी आमदार तथा पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केली.
पाटस येथील भिमा सहकारी साखर कारखान्यासमोर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, सत्वशील शितोळे, सारीका पानसरे, राणी शेळके, नितीन दोरगे आदींसह ऊस उत्पादक सभासद, कामगार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिमा पाटस कारखान्याला मागील दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटींची मदत दिली. मात्र त्यानंतरही कारखाना सुरळीतपणे सुरु होवू शकला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगून रमेश थोरात म्हणाले, दौंडच्या आमदारांकडे या कारखान्याचे नेतृत्व आहे. परंतु त्यांना स्वत: सुरु केलेल्या संस्थाही बंद कराव्या लागल्या आहेत. त्यातूनच ते भिमा पाटस कारखान्याबाबत किती तत्पर असतील हे दिसून येते.
यावेळी वैशाली नागवडे, आप्पा हंडाळ, आप्पासाहेब पवार, केशव दिवेकर, हनुमंत वाबळे आदींनी मनोगत व्यक्त करत कारखान्याच्या कारभारावर सडकून टिका केली. भिमा पाटस कारखान्याने यावर्षी गळीत हंगाम सुरु करावा, सभासद आणि कामगारांची थकीत देणी द्यावीत अशा प्रमुख मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या.











