महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश
निलेश भोंग, इंदापूर
बावडा परिसरातील घरकुल लाभार्थी व भूमिहीन नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायत बावडा येथील १३२ घरकुल लाभार्थींना गायरान जमीन उपलब्ध होणार असून, त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध घरकुल योजनांमध्ये अनेक लाभार्थ्यांची निवड झाली होती. मात्र स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने अनेक कुटुंबांना घरबांधणी सुरू करता येत नव्हती. त्यामुळे अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे घराचे स्वप्न अपूर्णच राहिले होते.
या समस्येची दखल घेत अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, बारामती उपविभागीय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. गायरान जमीन उपलब्ध करून देण्यासाठी विविध बैठका, चर्चा आणि प्रशासकीय स्तरावरील सूचना करण्यात आल्या. त्यांच्या प्रयत्नांनंतर प्रशासनाने संबंधित लाभार्थ्यांसाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
यामुळे आता १३२ भूमिहीन कुटुंबांना हक्काचे घर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळणार असून त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण होण्यास मदत होणार आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलापासून वंचित राहू नयेत, यासाठी हा पाठपुरावा करण्यात आल्याचे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले. या कामासाठी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, लाभार्थी नागरिकांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, घरकुल मंजूर होऊनही जागेअभावी अनेक अडचणी येत होत्या. अंकिता ठाकरे यांनी आमच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आमचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.










