बारामती : महान्यूज लाईव्ह
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर (बारामती) अंतर्गत कार्यरत असलेल्या शारदा स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी पुण्यात झालेल्या महापौर मल्लखांब चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत बारामतीचे नाव उज्ज्वल केले आहे. संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या क्रीडा सुविधांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संधी उपलब्ध होत आहेत.
पुण्यात झालेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील १८ संघांतील ५४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बारामतीच्या दोन मल्लखांबपटूंनी विशेष यश संपादन केले. शिवजीत संतोष वळकुंदे याने १४ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावत प्रथम क्रमांक मिळवला, तर वेदांत गाढवे याने १२ वर्षांखालील गटात रौप्यपदकाची कमाई केली. दोघांचीही बेस्ट ऑफ सिक्स फेरीसाठी निवड झाली होती.
यामध्ये शिवजीत वळकुंदे याने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आणि सर्वोत्कृष्ट मल्लखांबपटू हा मान मिळवला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते त्याला ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शिवजीतला प्रथम क्रमांकासाठी जाहीर करण्यात आलेला ११ हजार रुपयांचा धनादेश, तसेच बेस्ट ऑफ सिक्स सर्वोत्कृष्ट मल्लखांबपटू म्हणून १५ हजार रुपयांचा धनादेश शारदानगर येथे संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रशिक्षक सोमनाथ कोठावळे यांनी या दोघांना मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, मानव संसाधन प्रमुख गार्गी दत्ता, समन्वयक प्रशांत तनपुरे, संतोष वाघ, प्राचार्य सूर्यकांत मुंढे आदी मान्यवरांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










