देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचा नवा मंत्र दिला आहे. “पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, परदेशी प्रवास टाळा,” अशा तब्बल नऊ सूचनांचा वर्षाव मोदींनी हैदराबादमधील सभेतून केला.

आखाती युद्ध, वाढते तेलाचे दर आणि डॉलरवरील दबाव या पार्श्वभूमीवर मोदींनी हे आवाहन केल्याचं सांगितलं. मात्र, निवडणुका संपेपर्यंत सरकार शांत का होतं? असा उपरोधिक सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. “मतदान होईपर्यंत ‘अच्छे दिन’, मतदानानंतर ‘कमी खर्चाचे दिन’ सुरू झाले का?” असा टोला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोदींच्या या 9 सूचनांनी देशवासीयांची ‘लाईफस्टाईल’च बदलणार?
पंतप्रधानांनी नागरिकांना केलेल्या प्रमुख सूचना अशा –
पेट्रोल-डिझेल जपून वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, एक वर्ष सोनं खरेदी करू नका, परदेशी प्रवास टाळा, जास्तीत जास्त मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन बैठका वाढवा. परकीय वस्तूंची खरेदी कमी करा, डॉलरची बचत करा, सेंद्रिय खतांचा वापर वाढवा
या सूचनांनंतर सामान्य नागरिकांमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. “आधी ‘सबका साथ’, आता ‘सबकी बचत’,” अशी मिश्कील प्रतिक्रिया काहींनी दिली. तर “सोनं घेऊ नका म्हणणाऱ्या सरकारने आधी पेट्रोल 100 च्या खाली आणावं,” अशी मागणी विरोधकांनी केली.
मोदींनी परदेशातील डेस्टिनेशन वेडिंग टाळण्याचं आवाहन करताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. सामान्य माणूस आधीच गावातल्या मंगल कार्यालयात लग्न करतो, हा सल्ला नेमका कोणासाठी? असा प्रश्न नेटिझन्स विचारताना दिसले. काहींनी तर आता लग्नाचं कार्डही डिजिटल करा, कारण कागदही आयातीत असू शकतो, असा उपहासात्मक सल्ला देत सरकारवर निशाणा साधला.
सरकारचं स्पष्टीकरण – ही काळाची गरज
भाजप नेत्यांनी मात्र मोदींच्या आवाहनाचं समर्थन केलं आहे. आखाती संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून भारताने आतापासूनच बचतीचा मार्ग स्वीकारणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मात्र विरोधकांचा आरोप वेगळाच आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यानंतर आता सरकार नागरिकांनाच काटकसरीचे धडे देत आहे, असा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केला आहे. दरम्यान, मोदींच्या या आवाहनानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न फिरतोय, आता पुढचं आवाहन काय असेल? विकेंडला बाहेरचं खाणं बंद करा?











