राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
पाटस रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने उपस्थित प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवला. रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक मालगाडी सुरू झाल्याने एका ज्येष्ठ महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव थोडक्यात बचावला. महिलेने क्षणाचाही विलंब न करता थेट रुळांच्या मध्यभागी आडवी झोप घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ९) सकाळच्या सुमारास एक ज्येष्ठ महिला पाटस रेल्वे स्थानकावरून रेल्वे रुळ ओलांडत होती. त्याचवेळी स्थानकावर उभी असलेली मालगाडी अचानक सुरू झाली. गाडी हालू लागताच महिलेपुढे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मागे किंवा पुढे जाण्यास वेळ नसल्याचे लक्षात येताच तिने अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत रेल्वे रुळांच्या मधोमध आडवे झोपण्याचा निर्णय घेतला.
यानंतर मालगाडीचे अनेक डबे तिच्या अंगावरून गेले. हा प्रकार पाहून स्थानकावरील प्रवासी, नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मालगाडी पूर्णपणे पुढे गेल्यानंतर संबंधित महिला सुखरूप बाहेर आली. सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही.
हा संपूर्ण प्रकार पाहणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र अवघ्या दोन मिनिटांच्या या थरारक प्रसंगाने उपस्थितांच्या मनात भीती आणि धक्का निर्माण केला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडू नयेत, फुटओव्हर ब्रिज किंवा अधिकृत मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात येत असते. तरीही अनेकजण जीव धोक्यात घालून रुळ ओलांडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.










