डॉ. महेश घोळवे : महान्यूज लाईव्ह
तीस वर्षापासून घरोघरी वर्तमानपत्रे टाकून वाचकांना शिक्षित करणाऱ्या व त्यातच उदरनिर्वाह करणाऱ्या बापाने एक सुशिक्षित स्वप्न पाहिले..फक्त मुलीला जन्म द्यायचा..आणि खरोखरच त्याला मुलगी झाली..आणि त्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली.. त्यानं एका मुलीवर शस्त्रक्रिया केली म्हणून त्या काळी त्याची चर्चाही जास्त झाली.. मात्र त्यानं एक स्वप्न ठरवलं होतं.. आणि ते आपली पणती नक्कीच पूर्ण करेल असा विश्वासही त्याला होता.. त्यासाठी तिच्या पंखात आत्मविश्वासाचं बळ देत त्यानं तिचं नावच मुळी सपना ठेवलं… २७ वर्षानंतर ही सपना महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत नवा अध्याय घडवणारी महिला अधिकारी ठरली आहे..!
भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची कामगार कल्याण अधिकारी म्हणून सपना सुरेश ढगे ही मुलगी येत्या दोन दिवसांत कामास सुरवात करेल. मात्र तिने एक पराक्रम केला आहे. राज्याच्या साखर कारखानदारीतील पुरूषी मक्तेदारीला छेद देत पहिली महिला कामगार कल्याण अधिकारी बनण्याची कामगिरी केली आहे.
चार दिवसांपूर्वी छत्रपती कारखान्यात कार्यकारी संचालकांसह विविध पदांसाठी मुलाखती झाल्या. त्यामध्ये कामगार कल्याण अधिकारी पदासाठी अनेकजणांनी मुलाखत दिली. मात्र त्यामध्ये सपना हिने टाकलेला प्रभाव सर्वांनाच स्तिमीत करून गेला. तिने आयटी कंपनीत यापूर्वी मनुष्यबळ अधिकारी म्हणून काम केले असल्याने तिला मुलाखतकारांची एकमताने पसंती मिळाली आणि तिचे नाव साखर कारखानदारीत निश्चित झाले.
सपना हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. मात्र तिला तिच्या आवडीनुसार शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य तिचे वडील सुरेश व आई विद्या यांनी दिले. त्यामुळेच ती तिला हव्या त्या शाखेत प्रवेश घेऊन शिकली. तिने तेथेही शिकताना आईवडीलांच्या चिकाटीचे सार्थक केले. तिच्या शिक्षणाला पैसा कमी पडू नये यासाठी आई विद्या हिने वडील सुरेश यांच्या वर्तमानपत्राच्या व्यवसायाच्या जोडीला खानावळ चालवली.
सपना सांगते, मी शिकले, मात्र आत्मनिर्भर करण्याचे काम मात्र माझ्या आईवडीलांनी केले. मी जिथे काम केले, तिथे प्रामाणिकपणे केले. आताही जिथे काम करेल, तिथे प्रामाणिकपणेच करीन. माझ्या आईवडीलांनी २७ वर्षापूर्वी जे ध्येय ठेवले होते, ते ध्येय पूर्ण करण्याबरोबरच ज्या क्षेत्राची मी निवड केली आहे, तिथे महिलांवर ठेवलेला विश्वास सार्थ होतो हे सिध्द करण्यासाठी व संस्थेची प्रगती होण्यावरच माझा भर राहील.
मुलगी झाली हो.. रंग माझा वेगळा.. अशा मालिकांमधून आजही पुरूषसत्ताक संस्कृतीला उत्तेजन दिले जाते. मात्र वंशाला केवळ दिवा असेल, तरच तो कुटुंबाचे भविष्य उजळवतो असे नाही… अनेक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या बापाच्या हाताला बळ देणारा सपना पाहायचा असेल, तर घरातल्या पणतीच्या पंखात बळ द्या.. मग बघा.. काय घडतं ते..!










