बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याच्या दिशेने आघाडी घेत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत विजय जनतेला आणि आदरणीय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित केला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत उत्सुकतेचे वातावरण असताना त्यांच्या वक्तव्याने भावनिक छटा अधिक गडद झाल्या.
आज बारामतीकरांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते,असे सांगत सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने सर्वजण भावूक झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन केले. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असे त्या म्हणाल्या.
बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले, दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे – निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांना मिळत असलेल्या आघाडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी त्यांच्या आवाहनानंतर शांततेत विजय साजरा करण्यावर भर दिला जात आहे.











