छळाला कंटाळून गर्भवती नवविवाहितेची आत्महत्या; पती, सासू व दीराविरुद्ध गुन्हा
इंदापूर : मागच्या वर्षीच धुमधडाक्यात घरची परिस्थिती नसतानाही आईबापांनी लग्न लावून दिलं.. आपली मुलगी चांगल्या घरी जाईल असं त्यांना वाटलं.. लग्नाचा 15 लाख रुपयांचा खर्च 11 तोळे सोने देऊनही गर्भ श्रीमंतांची पैशाची हव्यास मात्र मिटेना.. मग सुरू झाला चारित्र्यावर संशय घेत सतत शारीरिक व मानसिक छळ.. अखेर या छळाला वैतागलेल्या १८ वर्षांच्या गर्भवती नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे सोमवारी (दि. २७) दुपारी घडली. या प्रकरणी पती, सासू व दीराविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवानी विकास शिंदे (वय १८, रा. वरकुटे बुद्रुक) असे मृत तरुणीचे नाव आहे. याबाबत तिची आई दीपली रामचंद्र जामदार (रा. बेलवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विकास अजिनाथ शिंदे, दीर प्रकाश अजिनाथ शिंदे आणि सासू सुरेखा अजिनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये शिवानीचा विवाह विकास शिंदे याच्याशी झाला होता. लग्नावेळी मुलीच्या कुटुंबाकडून सुमारे १५ लाख रुपये खर्च व ११ तोळे सोने देण्यात आले होते. काही काळ संसार सुरळीत सुरू असताना नंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत पतीकडून मोबाईल तपासणे, फोनवर कोणाशी बोलते याची चौकशी करणे, तसेच मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले. या छळात सासू व दीरही सहभागी होत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, फिल्टर पाण्याच्या प्लांटसाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी शिवानीवर दबाव टाकून छळ वाढवण्यात आला. अखेर माहेरकडून ५० हजार रुपये दिल्यानंतर काही काळ परिस्थिती शांत झाली, मात्र छळ पुन्हा सुरूच राहिला. गर्भवती असतानाही तिच्यावर अत्याचार होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
२७ एप्रिल रोजी शिवानीने आईला फोन करून तब्येत बिघडल्याचे सांगत उपचारासाठी दवाखान्यात न नेत असल्याची खंत व्यक्त केली. त्यानंतर काही वेळातच तिने गळफास घेतल्याची माहिती समोर आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
आठ दिवसापूर्वी शिवानीच्या आईने देखील केला होता आत्महत्येचा प्रयत्न..
मुलगी सुखात नांदेड यासाठी ऐपत नसताना देखील केलेला खर्च समोर दिसत असताना मुलीला मात्र होत असला त्रास तिच्या आईलाही पाहवत नव्हता. सासरच्या लोकांच्या सततच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून मुलीनं आत्महत्या केली. पण मुलीला होत असलेल्या त्रासामुळे आईने देखील मागील आठ दिवसापूर्वी औषध पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता.
गुन्हा तर दाखल झाला मात्र..
आरोपींना अद्याप पर्यंत अटक होत नसून तीनही आरोपी अद्यापपर्यंत मोकाट असून पोलीस त्यांना अटक करण्यासाठी कोणती उपाययोजना करत नाहीत तसेच हुंडाबळीची कलमे लागू होत असताना देखील जाणीवपूर्वक पोलिसांनी कलमी लावली देखील नाहीत या लोकांनी महिला आयोगाकडे देखील तक्रार अर्ज करून दाद मागितलेली आहे. आरोपींना तातडीने अटक होणे व आवश्यक कलमे लावून गुण्याचा योग्य तपास होणे गरजेचा आहे.











