राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायत सरपंच पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार रमेश थोरात यांचे खंदे समर्थक विशाल नरेंद्र थोरात यांंचा दणदणीत विजय झाला असून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला नेत्या रूपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बबन बोराटे यांचा दारुण पराभव झाला आहे.
दौंड तालुक्याचे नव्हे तर पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत तालुक्यातील राजकीय समीकरणांची चांगलीच उलथा पालथ झाली आहे. ही निवडणुकीत काटे की टक्कर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार रमेश थोरात यांचे समर्थक विशाल नरेंद्र थोरात यांनी तब्बल ३०४ मतांनी दणदणीत विजय मिळवला. ते या निवडणुकीत ‘जायंट किलर’ ठरले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावी नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पोपटराव कुंडलिक बोराटे यांचे पुतणे संतोष बबन बोराटे यांना पराभवाचा सामना करावा लागला असून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना हा मोठा राजकीय धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नांदूर ग्रामपंचायत च्या सरपंच रिक्त पदासाठी पोट निवडणूकीसाठी मंगळवारी ( दि २८) मतदान प्रक्रिया पार पडली.
थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. बुधवारी (दि २९) मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सरपंच पदासाठी ४ उमेदवार रिंगणात उभे होते. मात्र विशाल थोरात आणि संतोष बोराटे यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली. विशाल नरेंद्र थोरात यांना ८३० तर संतोष बबन बोराटे यांना ५२६ मते मिळाली.
तब्बल ३०४ मतांची आघाडी घेत विशाल थोरात यांनी बाजी मारली त्यामुळे या निवडणुकीत ते जॉईंट किलर ठरले असून ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विराजमान झाले आहेत. त्याच बरोबर किरण विजय थोरात यांना २१, जमालुद्दीन कादर शेख १३५, यशवंत प्रभाकर बर्वे ३८ अशी इतर उमेदवारांना मते मिळाली आणि नोटा (NOTA) ५ मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी जयंत भोसले, ग्राम महसूल अधिकारी पांडुरंग कोळगे,
ग्राम अधिकारी विजय भंडारे यांनी कामकाज पाहिले. मतमोजणीनंतर नवनिर्वाचित सरपंच विशाल थोरात यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.










