सध्या जगभरात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) ची प्रचंड लाट उसळली असून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी स्पर्धा रंगली आहे. मात्र या शर्यतीत एकाच देशाचा एकछत्री दबदबा स्पष्टपणे दिसून येतो—तो म्हणजे अमेरिका. बाजार भांडवलाच्या (Market Capitalization) आधारे जगातील टॉप १० एआय कंपन्यांमध्ये सर्वच्या सर्व कंपन्या अमेरिकेतील असल्याचे चित्र समोर आले आहे.
एनव्हिडिया, ॲपल, अल्फाबेट (गूगलची मूळ कंपनी) आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गजांनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे एनव्हिडिया ही कंपनी केवळ एआय क्षेत्रातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांमध्ये जगातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी ठरली आहे. जगातील टॉप ६३ एआय कंपन्यांपैकी तब्बल ४४ कंपन्या एकट्या अमेरिकेच्या आहेत. यावरून या क्षेत्रातील अमेरिकेची ताकद किती मोठी आहे, हे स्पष्ट होते.
चीन-इस्राईलची पुढे जाण्याची धडपड
या यादीत चीनच्या ६ आणि इस्राईलच्या ४ कंपन्यांनी स्थान मिळवले आहे. तसेच सिंगापूर आणि यूएईमधील कंपन्याही हळूहळू या क्षेत्रात आपली पकड मजबूत करत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केल्याचा दावा करणाऱ्या भारताची मात्र या यादीत एकही कंपनी नसणे ही गंभीर बाब मानली जात आहे. स्टार्टअप्स आणि आयटी क्षेत्रात मोठी ताकद असतानाही जागतिक एआय स्पर्धेत भारत मागे पडल्याचे दिसत आहे.
अनलिस्टेड कंपन्यांचीही ताकद
ही यादी फक्त शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांवर आधारित असली तरी ओपनएआय, ॲंथ्रोपिक, डेटाब्रिक्स यांसारख्या अनलिस्टेड कंपन्याही एआय क्षेत्रात मोठे बदल घडवत आहेत. तज्ज्ञांच्या मते, भारताने संशोधन, गुंतवणूक, उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन यावर भर दिल्यास एआय क्षेत्रात मोठी झेप घेण्याची संधी आहे. अन्यथा ही स्पर्धा भविष्यात आणखी कठीण होऊ शकते. एआय ही केवळ तंत्रज्ञानाची शर्यत नसून भविष्यातील अर्थव्यवस्था आणि सामर्थ्य ठरवणारा निर्णायक घटक ठरत आहे. त्यामुळे भारताने वेळीच पावले उचलणे गरजेचे ठरत आहे.











