दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर पाटस ते भिगवण व पाटस ते यवत पर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र या खड्ड्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व या मार्गावरून प्रवास करणा-या वाहनांकडून टोल आकारणारी टोल वसूल करणारी संबंधित कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. परिणामी या सेवा रस्त्यावर अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.
पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करताना स्थानिक नागरीकांना दळवळणासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता केला आहे. मात्र सध्या या सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पाटस घाटातील सेवा रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते, परिणामी या खड्ड्यात वाहने आदळून अपघात होत आहेत.
काही दिवसापुर्वी पुणे सोलापूर महामार्गाच्या रस्त्यांचे डांबरीकरण करून दुरूस्ती केली आहे. मात्र हे काम करताना संबंधित प्रशासनाने सेवा ररस्त्यांची मात्र दुरूस्ती करण्याकडे सोईस्कर पणे टाळले आहे. यामुळे स्थानिक नागरीकांना या रस्त्यावरून येजा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत.
पाटस टोल नाका ते भिगवण व पाटस टोल नाका ते यवत या पुणे व सोलापूर कडे जाणारा दोन्ही बाजूवरील सेवा रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे सेवा रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या घटना सातत्याने घडत आहेत.
काही गावांमध्ये सेवा रस्त्याचे काम अपुरे आहे, तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे केली नाहीत, याचा नाहक त्रास स्थानिक नागरीकांना होत आहे. ग्रामस्थ मागील अनेक वर्षापासून प्रलंबित सेवा रस्त्यांची कामे पूर्ण करावीत यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व टोल नाका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांच्याकडून या मागण्याला केराची टोपली दाखविण्यात येत आहे.
टोल नाका प्रशासन महामार्गावर प्रवास करणा-या वाहनांकडून टोल आकारते, या पैशातून सेवा रस्त्यांची कामे पुर्ण करावीत, सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने डांबरीकरण करून दुरूस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरीक करीत आहेत.











